राज्याचे मुख्यमंत्रीच फेक नरेटीव्ह पसरवतात; हा घ्या पुरावा! विजय वडेट्टीवार यांनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिंक अत्याचाराच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. एकीकडे राज्यातील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र मुख्यमंत्री खुलेआम भर सभेत जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर असून राज्याचे मुख्यमंत्रीच फेक नरेटीव्ह पसरवत असल्याचा आरोप केला आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीच फेक नरेटीव्ह पसरवतात, याचा पुरावा! बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला दोन महिन्यात फाशी दिली, असं भर सभेत धडधडीत खोट बोलतात? मुख्यमंत्र्यांनी सांगावं महायुती सरकारच्या काळात दोन महिन्यात कोणत्या आरोपीला फाशी दिली? शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून बलात्कारी तर सोडा, इतर कोणत्या प्रकरणातील आरोपीला दोन महिन्यात फाशी झाली? त्या आरोपींची नावं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी, असे थेट आव्हान विजय वडेट्टीवार यांनी दिले.

राज्याचा मुख्यमंत्री संशयी आत्मा; संजय राऊत यांचा घणाघात, फेक नरेटीव्हवरूनही केला मिध्यांवर प्रहार

हे महाविनाशी सरकार आल्यावर फक्त एसआयटीची स्थापना होते, त्याचा अहवाल येतो का, कारवाई होते का? मुख्यमंत्री खुलेआम भर सभेत जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्यात पुढे आहेत. मुख्यमंत्री महोदय ,बलात्कार सारख्या प्रकरणात तरी न केलेल्या कामाचे श्रेय तरी घेऊन नका, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.

शिंदे- फडणवीस-अजित पवार सरकारचे अजून एक फेक नरेटिव्ह

बदलापूर प्रकरणी केलेले आंदोलन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित होते, यातील आंदोलनकर्ते बदलापूरच्या बाहेरचे होते हा आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पोलिसांची रिमांड कॉपी बघावी. अटक केलेल्या सगळे आंदोलकांचे पत्ते बदलापूरचे आहे. या सरकारला फक्त स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे, पण सरकारवर एखादा आरोप झाला की लगेच विरोधकांना दोष द्यायचा. स्वतः मात्र कोणत्याच घटनेची जबाबदारी घ्यायची नाही, असा घणाघातही वडेट्टीवार यांनी केला.