
गेल्या सात दशकांपासून विक्रमगडचे ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक केंद्र ठरलेल्या पुरातन संतोषी माता मंदिराचा लवकरच कायापालट होणार आहे. या ऐतिहासिक देवस्थानचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक, युवासेना आणि महिला आघाडीने सोडला आहे. त्यामुळे शहराच्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलात हरवलेले हे ७० वर्षांचे शक्तिपीठ पुन्हा उजळून निघणार आहे.
एकेकाळी भविकांच्या गर्दीने फुलून जाणारे हे मंदिर उंच इमारतींच्या विळख्यात अडकले. त्यामुळे देखभालीअभावी या मंदिराच्या भिंतींना तडे गेले, छताची पडझड झाली. पावसाळ्यात होणारी गळती आणि परिसरातील अस्वच्छता यामुळे मंदिराच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला.
याची गंभीर दखल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने घेतली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प शिवसैनिकांनी सोडला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ओमकार पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक, युवा सैनिक आणि महिला आघाडी कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी विक्रमगड तालुकाप्रमुख प्रमोद पाटील, शहरप्रमुख मनोज खरपडे, जिल्हा संघटिका वैष्णवी व्यापारी, मनीषा भानुशाली, जिल्हा युवा अधिकारी अभिषेक जाधव आदी उपस्थित होते.
मुख्य मूर्तीचे पावित्र्य राखून गाभाऱ्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. मंदिराभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येईल. तसेच परिसरात भाविकांना बसण्यासाठी व्यवस्था केली जाईल. हे मंदिर आमच्या शहराच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहे. पण आता सर्वांच्या सहकाऱ्याने या मंदिराला पुन्हा वैभव प्राप्त करून देऊ.
– ओमकार पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख





























































