विनेश फोगाट मायदेशी परतली; दिल्लीत पाऊल ठेवताच अश्रुंचा बांध फुटला, विमानतळावर स्वागतासाठी गर्दी

फ्रान्सच्या पॅरिस शहरात पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महिलांच्या कुस्तीत हिंदुस्थानला एकही पदक मिळाले नाही. 50 किलो वजनी गटामध्ये फायनलपर्यंत पोहोचूनही विनेशला पदकाने हुलकावणी दिली. 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. विनेशला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात अपयश आले असले, तरी या महिला कुस्तीपटूने अवघ्या देशवासियांचे मन जिंकले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली विनेश शनिवारी सकाळी मायदेशी परतली. दिल्लीमध्ये पाऊल ठेवताच तिच्या अश्रुंचा बांध फुटला.

विनेश फोगाट ही आधी कोलकाताला उतरली आणि तिथून दिल्लीला पोहोचली. दिल्ली विमानतळावर तिच्या स्वागतासाठी रोहतकचे खासदार दीपेंद्र हुड्डा, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्यासह शेकडो क्रीडाप्रेमी जमले होते. विमानतळाबाहेर येताच पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करण्यात आले. यावेळी बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकने तिच्याशी संवाद साधत सांत्वनही केले. त्यानंतर विमानतळापासून एक रॅलीही काढण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी जमली होती.

मायदेशी दाखल होण्याआधी विनेश फोगाट हिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट टाकली होती. यात तिने कुस्तीच्या प्रवासाचा उल्लेख करत इथपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या लोकांचे आभार मानले.