विनेश फोगाटची ऐतिहासिक झेप, टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट बुक

581

जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये हिंदुस्थानच्या खेळाडूंनी देदीप्यमान कामगिरी केल्यानंतर जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्येही हिंदुस्थानच्या खेळाडूंचा बोलबाला दिसून आला. विनेश फोगाट या अनुभवी खेळाडूने 53 किलो वजनी गटात मारिया प्रेवोलाराकी हिला 4-1 अशा फरकाने ‘अस्मान’ दाखवत कास्यपदकावर मोहोर उमटवली. हे तिचे जागतिक चॅम्पियनशिपमधील पहिलेच पदक ठरले. तसेच या मानाच्या स्पर्धेत पदक जिंकणारी ती पाचवी हिंदुस्थानी महिला खेळाडू ठरलीय. याचसोबत तिने 2020 सालामध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकचे तिकीटही बुक केले.

पूजा धंडा हिनेही 59 किलो वजनी गटात जबरदस्त कामगिरी केली. उपांत्य फेरीत तिला हार सहन करावी लागली, मात्र आता कास्यपदकासाठी ती लढणार आहे. या लढतीत ती जिंकल्यास जागतिक चॅम्पियनशिपमध्ये दोन पदके जिंकणारी ती बजरंग पुनियानंतर दुसरीच हिंदुस्थानी खेळाडू ठरील.

माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम पदक!
दहा महिने आधी मी वेगळ्या वजनी गटात खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जागतिक स्पर्धेतील हे पदक माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम ठरले आहे. याबद्दल मी शब्दांत वर्णन करू शकत नाही, असे विनेश फोगाट यावेळी म्हणाली.

आपली प्रतिक्रिया द्या