Exclusive – प्रसिद्ध माजी क्रिकेटपटूचा MCA च्या इनडोअर अकादमीच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज

मुंबई क्रिकेट संघटनेच्या इनडोअर क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशिक्षकपद अद्यापही रिकामे आहे. अत्याधुनिक साधन सुविधांनी सुसज्ज असलेल्या या अकादमीच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटू साईराज बहुतुले याचे नाव क्रिकेट सुधार समितीने सुचवले होते. बहुतुले हा राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक आहे. आयपीएलचे उरलेले सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवले जाणार असून या सामन्यांकडे बहुतुले याने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे मुख्य प्रशिक्षकपद हे जून 2021 पासून अजूनपर्यंत रिकामे आहे. यामुळे संपूर्ण पावसाळ्यात इथे क्रिकेटपटूंना सराव करता आलेला नाहीये. या अकादमीसाठीचा मुख्य प्रशिक्षक हा पावसाळ्याच्या सुरुवातीला नेमणं गरजेचं असतं. पावसामुळे खुल्या मैदानात सराव करणं कठीण जातं, ज्यामुळे या काळातील सराव हा  इनडोअर स्वरुपात केला जातो. यासाठी मुख्य प्रशिक्षकही गरजेचा असतो, मात्र तो आतापर्यंत नेमण्यात आलेला नाहीये.

मुंबई क्रिकेट संघटनेच्या इनडोअर क्रिकेट अकादमीच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने अर्ज दाखल केला आहे. त्यासाठीचा ईमेल त्याने संघटनेला पाठवला आहे. आम्ही जेव्हा विनोद कांबळी याच्याशी फोनवरून संपर्क साधला तेव्हा त्याने आपण या पदासाठी अर्ज केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मुंबई क्रिकेट संघटनेकडून आपल्याला अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याचं त्याने सांगितलं आहे. आपण संघटनेच्या उत्तराची वाट पाहात असल्याचं त्याने सांगितलं आहे.

अकादमीचे मुख्य प्रशिक्षकपद मिळाल्यास योजना कशा राबवायच्या याबाबत आपल्या डोक्यात प्लॅन तयार असल्याचं कांबळी याने सांगितलं आहे. नामांकीत क्रिकेटपटू असो अथवा अंडर 14 किंवा अंडर 16 वयोगटातील क्रिकेटपटू असो जर या सगळ्यांना सरावाची करता येत नसेल तर या सगळ्यांना सरावाची संधी उपलब्ध कशी करून देता येईल, यासाठीची निश्चित योजना आपल्याकडे तयार असल्याचे कांबळी याने सांगितले. मुंबई क्रिकेट संघटनेची इनडोअर क्रिकेट अकादमीमध्ये असलेल्या सोईसुविधा पाहिल्यास त्या तोडीच्या सोई या देशात 2 ठिकाणं सोडली तर इतर कुठेही नाहीत. ही अकादमी उत्त असून मी तसेच सचिन तेंडुलकरही इथे सराव करतो असे कांबळी याने सांगितले.

मुंबई क्रिकेट संघटनेच्या शिखर समितीतील काही सदस्यांनी विनोद कांबळी याच्या नावाची शिफारस केली होती. साईराज बहुतुले हा आयपीलमध्ये व्यस्त असल्याने तो 15 ऑक्टोबरपर्यंत मोकळा होणं शक्य नाहीये. त्यामुळे कांबळी याच्या नावाचा मुख्य प्रशिक्षक पदासाठी विचार केला जावा असं या सदस्यांनी म्हटले होते. संघटनेने याबाबतचा प्रस्ताव पारीत करून तो क्रिकेट सुधार समितीच्या अध्यक्षांकडे पाठवावा असं या सदस्यांनी म्हटलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या