मणिपूरमध्ये वृद्धाच्या हत्येनंतर पुन्हा हिंसाचार; जिरीबाममध्ये 200 मैतेई लोकांना जंगलात हलवले

मणिपुरात 3 मे 2023 पासून जातीय हिंसाचार सुरू असून अद्यापही तोडगा निघालेला नाही. केंद्रासह राज्य सरकार 13 महिन्यांपासून हतबल झाल्यानंतर आता ‘जैसे थे’ परिस्थिती आहे. यादरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर मणिपूरच्या जिरीबाममध्ये 59 वर्षीय सोइबाम सरतकुमार सिंग नामक वृद्धाची हत्या करण्यात आली. ते आपल्या शेताकडे गेले असता त्यांच्यावर धारदार शस्त्राने जखमा करत हत्या केल्याचे समोर आले. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी निदर्शने करत त्यांच्याकडून घेतलेली परवानाधारक शस्त्रे त्यांना परत करण्याची मागणी केली.

मणिपूर पोलिसांनी इम्फाळमध्ये उपस्थित असलेल्या राज्य पोलीस कमांडो अधिकार्‍यांना जिरीबामला पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. हिंसाचारामुळे 200 मैतेई लोकांना सुरक्षित ठिकाणी जंगलात पाठवण्यात आले असून, अनेक गावकरी राहत आहेत. मैतेई समाजातील वृद्धाची हत्या आणि लोकांच्या घरांना आग लावण्यामागे कुकी अतिरेक्यांचे नाव पुढे येत आहे.

कुकी आणि झोमी या अतिरेकी संघटनांनी म्यानमार आणि इतर दहशतवादी संघटनांच्या संगनमताने, प्रदेशातील सध्याच्या अशांततेचा फायदा घेण्याच्या आणि सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या उद्देशाने हा कट रचला. राज्यात अनेक ठिकाणी सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये हाओकीपने विशेष भूमिका बजावली आहे. दुसरीकडे मणिपूरमध्ये १३ महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराचा कथित सूत्रधार एनआयएने उघड केला आहे. मोंगबांग खुल भागातील मैतेई लोक भीतीने घर सोडून पळून गेले आहेत. या सर्वांनी जिरीबाम येथील चिंगडोंग लेइकाई येथील एलपी स्कूलमध्ये आश्रय घेतला आहे. हिंसाचार आणि जाळपोळ होऊ नये, म्हणून जिल्हा दंडाधिकार्‍यांनी कलम १४४ लागू केले आणि त्यानंतर कर्फ्यू लागू केला. कुकी या समुदायाचे म्हणणे आहे की, मैतेई संघटनेने जिरीबाममधील कुकी लोकांवर हल्ले सुरू केले आहेत.