मराठीचा अवमान करणाऱ्या विरारच्या मुजोर रिक्षाचालकाला बेदम चोपले, शिवसैनिकांनी धडा शिकवला

मी हिंदी, भोजपुरीतच बोलणार.. मराठी अजिबात बोलणार नाही.. असे म्हणत दादागिरी करणाऱ्या विरारमधील मुजोर रिक्षाचालकाला शिवसैनिकांनी कानफटवले. राजू पटवा असे या रिक्षाचालकाचे नाव असून यापुढे मराठी भाषा, महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अपमान करणार नाही, अशा शब्दांत त्याने सपशेल माफी मागितली आहे.

दोन दिवसांपूर्वी भावेश पडोलिया हा दुचाकीस्वार जात होता. त्यावेळी राजू पटवा या रिक्षाचालकाने ओव्हरटेक केले. त्याचा जाब भावेशने मराठीतून विचारला. त्यामुळे संतप्त झालेल्या रिक्षाचालकाने त्याला हिंदीमधून बोलण्याची सक्ती केली. एवढेच नव्हे तर रिक्षाचाल काने भावेशच्या बहिणीलादेखील धक्काबुक्की केली.

…तर शिवसेना स्टाइलनेच उत्तर

हिंदी व भोजपुरीमधूनच बोलेन, अशी मुजोरी करणारा रिक्षाचालक राजू पटवा हा अखेर आज शिवसैनिकांना सापडला आणि त्याला कानफटवले. एवढेच नव्हे तर माफीही मागायला लावली. यापुढे मराठी माणसांबाबत कोणी अपमानास्पद बोलले तर शिवसेना स्टाइलनेच उत्तर मिळेल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख उदय जाधव यांनी दिला आहे.