सत्ता आणि खोक्यांसाठी अनेक जण मिंध्यांच्या वळचणीला गेले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मशालच तेजाने तळपेल असा विश्वास व्यक्त करतानाच शिवसैनिकांनी गद्दारांविरोधात एकीची वज्रमूठ वळली. वाड्यात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शेकडो शिवसैनिकांनी विजयाचा निर्धार केला.
शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांच्या उपस्थितीत वाड्यात शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी ज्योती ठाकरे यांनी मिंधे गटावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत बसलेल्या तडाख्यानंतर भाजप-मिंधे गटाची तंतरली असून विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून खोके सरकारने आश्वासनांचा पेटारा उघडला आहे. ‘लाडकी बहीण’ योजनाही त्याचाच भाग आहे. मात्र दुसरीकडे कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या असून आधी महिलांना सुरक्षा द्या, असे खडेबोल त्यांनी सुनावले.
दोनशे कार्यकर्त्यांचा प्रवेश
वाडा येथील मेळाव्यात परिसरातील जवळपास 200 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आगामी निवडणुकीत एकीची वज्रमूठ वळून आपल्या हक्काचा प्रतिनिधी विधानसभेत पाठवायचा आहे. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील त्याला विजयी करण्याचा बेलभंडार आम्ही उचलला आहे, असा निर्धार पालघर जिल्हा सहसंपर्कप्रमुख नीलेश गंधे यांनी यावेळी व्यक्त केला. वाडा तालुकाप्रमुख नीलेश पाटील व उपजिल्हाप्रमुख प्रकाश केणे यांनी या मेळाव्याचे यशस्वी आयोजन केले. यावेळी तालुक्यातील आदर्श व्यक्तींचा सत्कार करून कुडूस येथील रुग्णालयाला व्हेंटिलेटर भेट देण्यात आले. कार्यक्रमासाठी जिल्हाप्रमुख अनुप पाटील, सोन्या पाटील, अरुण पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख गोविंद पाटील, माजी नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, शहरप्रमुख प्रमोद घोलप, प्रयोगशील शेतकरी अनिल पाटील आदी उपस्थित होते.