असह्य करणाऱया उकाडय़ाचा एका सराईत गुन्हेगाराने पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात त्यात तो यशस्वीदेखील ठरला. पण अखेर वडाळा टी.टी. पोलिसांचा त्याच्यावर हात पडला आणि त्याने चोरलेले 23 मोबाईल हस्तगत करता आले.
वडाळ्याच्या संगमनगरात राहणारा रवी कनोजिया (20) हा तरुण उकाडय़ाने हैराण झाल्याने 12 मे रोजी दुपारच्या वेळेस तो काम करत असलेल्या कारखान्याचा दरवाजा उघडा ठेवून झोपला होता. नेमकी ही संधी साधत आरोपी कारखान्यात घुसला आणि रवीचा आयपह्न उचलून घेऊन गेला. रवीने याबाबत तक्रार दिल्यानंतर वडाळा टी.टी. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वडाळा परिसरात रात्रीच्या वेळेस हवा यावी याकरिता दरावाजा उघडा ठेवून झोपणाऱयांच्या घरातून मोबाईल चोरीच्यादेखील तक्रारी येत होत्या. त्यामुळे याची गंभीर दखल घेत वरिष्ठ निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नीलेश मोरे तसेच माने, भोसले, निकम, जावीर व केदारे या पथकाने तत्काळ तपास सुरू केला. चोरीची घटना घडली त्या ठिकाणचे खासगी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ऐक सराईत आरोपी त्या परिसरात वावरताना दिसून आला. त्यामुळे पथकाने त्याचा मोबाईल नंबर मिळवून शिवडीच्या आरएके मार्ग परिसरात राहणाऱया रवी गुप्ता (22) याला उचलले. त्याला पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने चोरलेल्या 23 मोबाईलची माहिती दिली. ते सर्व मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले.
रात्रीचा खेळ चाले
वडाळा परिसरातील बैठय़ा घरात राहणारे बरेच लोक उकाडय़ापासून थोडा दिलासा मिळावा यासाठी रात्री दरवाजा उघडा ठेवून झोपतात. ही बाब हेरून रवी गुप्ता पहाटेच्या वेळी लोक साखरझोपेत असताना घरात घुसतो आणि मोबाईल घेऊन जातो. अशा प्रकारे त्याने बरेच मोबाईल चोरले असून आणखी मोबाईल हस्तगत होतील असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येते. रवी हा चोरलेले मोबाईल कमी किमतीत कामगार, मजुरांना विकत होता. रवी विरोधात अनेक गुह्यांची नोंद आहे.