
तेलंगणात एका रस्त्याचे चौपदरीकरण करताना एका घराची भिंत अडचण ठरत होती. हे घर दुसरे तिसरे कुणाचे नसून मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचे होते. मग ही भिंतच हटवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. विकासकामांत कुठलाही प्रकराचा भेदभाव होता कामा नये असे रेड्डी म्हणाले.
नागरकुरनूल जिल्ह्यातील वांगूर मंडळातील मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या मूळ गावी, कोंडारेड्डीपल्ली येथे रस्त्याचे रुंदीकरण सुरू होते. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या घराची चार भिंतींची अडथळा ठरत असल्याचे दिसले, तेव्हा रेड्डी यांनी कोणताही विचार न करता ताबडतोब ते तोडण्याचा आदेश दिला. रस्त्याच्या रुंदीकरणादरम्यान अनेक गावकऱ्यांची घरेही पाडावी लागली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या रस्तामुळे गावातील एकूण 43 घरे अंशतः तोडण्यात आली आहेत. मात्र, सीएमने स्वतःच्या घराचे कुंपण तोडण्याचा आदेश दिल्यामुळे गावकरी रेवंत रेड्डी यांच्या निर्णयाचे कौतुक करत आहेत.
कोंडारेड्डीपल्ली येथे रस्ता बांधण्यास अडथळा ठरत असलेली मुख्यमंत्र्यांच्या घराची चार भिंतींची कुंपण दोन दिवसांपूर्वी त्यांच्या आदेशावर अधिकाऱ्यांनी पाडून टाकली. याबाबत बोलताना अतिरिक्त जिल्हाधिकारी देवसहायम यांनी सांगितले की, मुख्यमंत्री यांनी दोन महिन्यांपूर्वीच रस्त्याच्या रुंदीकरणात आपले घर गमावणाऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरच रस्ता बांधकामाच्या कामाला गती मिळाली आहे.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या घराचे कुंपण अधिकाऱ्यांनी पाडले असून आता त्याच्या पुनर्निर्माणाचे काम सुरू आहे. या प्रकरणावर गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विचारांचे कौतुक केले आहे. रेड्डी मुख्यमंत्री असले तरी त्यांनी कोणताही भेदभाव न करता अधिकाऱ्यांना स्वतःच्या घराची भिंत तोडण्याचा आदेश दिला. मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या फायद्याचा विचार न करता गावकऱ्यांच्या भल्याचा विचार केला आहे. अशा प्रकारचा आदेश देणे हे अत्यंत प्रशंसनीय असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.