युद्ध अमेरिकेने लादले, आता हिशोब पूर्ण झाल्याशिवाय थांबणार नाही; अली लारीजानींच्या मृत्यूनंतर इराणचा आक्रमक पवित्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रायली हवाई हल्ल्यात इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रमुख अली लारीजानी यांचा मृत्यू झाल्याने पश्चिम आशियात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर इराणने अत्यंत कठोर भूमिका घेतली असून, या संघर्षासाठी थेट अमेरिकेला जबाबदार धरले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले की, एखाद्या नेत्याच्या जाण्याने इराणची रणनीती बदलणार नाही आणि हा संघर्ष यापुढेही सुरूच राहील.

परराष्ट्र मंत्री अराघची यांनी अल जजीराशी बोलताना सांगितले की, वाशिंग्टनने (अमेरिका) या युद्धाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, कारण यामुळे होणाऱ्या मानवी आणि आर्थिक हानीला तेच कारणीभूत आहेत. इराणचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई केल्याशिवाय आणि इराणच्या सार्वभौमत्वाचा आदर केल्याशिवाय हे युद्ध थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुजच्या सामुद्रधुनीबाबत इराणने कडक भूमिका घेतली आहे. अराघची यांनी इशारा दिला की, “सध्याच्या परिस्थितीत इराण या मार्गावरून अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांची जहाजे जाऊ देणार नाही.” या मार्गावरून जगातील सुमारे २० टक्के तेल आणि वायूची वाहतूक होते, त्यामुळे इराणच्या या निर्णयाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, अली लारीजानी यांचा मृत्यू तेहरानजवळ त्यांच्या मुलीच्या घरावर झालेल्या इस्रायली हल्ल्यात झाला. या हल्ल्यात त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे. अराघची यांनी या मृत्यूला बलिदान म्हटले असून, यामुळे इराण अधिक कमकुवत होण्याऐवजी अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. “व्यवस्था ही व्यक्तीपेक्षा मोठी असते,” असे म्हणत त्यांनी म्हटले की, सध्याचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्या नेतृत्वाखाली इराण आपली धोरणे पुढे चालू ठेवेल.