वारकऱ्यांना मिंधे सरकारच्या अनुदानाची गरज नाही, संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रशांत महाराज यांनी सुनावले

 राज्य शासनाने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यातील प्रत्येक दिंडीला 20 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र शासनाच्या मदतीवर वारी म्हणजे वारी या भक्तीरसपूर्ण शब्दावर आणि परंपरेवरच आघात आहे. पंढरीची वारी ही एक साधना आणि व्रत आहे. त्यामुळे पंढरीची वारी आहे माझे घरी, पण ती शासनाच्या 20 हजारी उपकारावर, अशी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ मदतीचा हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज, वारकरी संत विचार महापरिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहूकर यांनी केली आहे.

महाराज म्हणाले, छत्रपती शिवरायांनी पाठवलेला नजराणा तुकोबारायांनी स्पर्श न करता परत पाठवला होता आणि तुमचे येर वित्त धन । ते मज मुत्तीके समान? असा त्या धनाचा माती म्हणून उल्लेख केला होता. त्यामुळे जगद्गुरू तुकोबारायांचा आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा वारीत गजर करणारा खरा वारकरी किंवा दिंडी प्रमुख अशी शासनाकडे कोणतीही पैशांची मागणी करणार नाही. तुकोबारायांनी सांगितले आहे, हात पसरी जिणे धिग त्याचे? हे खरे राजकारणी, पण दाखवायला वारकरी अशा स्वहिताचा धंदा करणाऱ्या लोकांची मागणी आहे. वारीची परंपरा हजार वर्षांपासून चालू आहे. संसार सोडून निरपेक्ष भावनेने वारकरी पंढरीची वारी करतात. स्वकमाईतून दिंडीला 500 ते काही हजार त्या वारकऱयाकडून भिशी दिली जाते. अनेक ठिकाणी दिंडय़ांच्या पंगती ठरलेल्या असतात. अन्नदात्यांकडून अन्नदान केले जाते. त्यामुळे वारकऱ्यांना या 20 हजाराच्या मदतीची आवश्यकता नाही.

पंढरीच्या वारकऱ्यांना या 20 हजाराच्या मदतीची आवश्यकता नाही. तो निधी सरकारने वारीच्या वाटेवर सोयीसुविधांसाठी किंवा इतर मदतीसाठी खर्च करावा. खरा आचार, विचार आणि उच्चार करणाऱ्या पंढरीच्या वारकऱ्यांनी ही मदत स्वीकारू नये, असे आवाहनही मोरे महाराजांनी केले आहे.