
वरळीतील पूनम चेंबर्स या इमारतीला आज सकाळी पावणेबाराच्या सुमाराला आग लागली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली वाऱयामुळे इमारतीच्या अन्य मजल्यांवर वेगाने आग पसरत गेली. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी 10 बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. सुट्टीचा दिवस असल्याने या इमारतीमधील कार्यालये रिकामी होती. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. दरम्यान, आगीची माहिती मिळताच शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली.
वरळीतील पूनम चेंबर्स या सात मजली इमारतीला आज सकाळी 11.39 वाजता आग लागली. आगीची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. समुद्राच्या बाजूला असल्यामुळे वाऱयाच्या वेगाने दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग पसरत तिसऱ्या मजल्यावर पोहोचली. त्यामुळे अग्निशमन दलाने या आगीला धोकादायक म्हणून घोषित केले. मात्र काही अवघ्या काही मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. या आधीदेखील अनेक वेळा या इमारतीला आग लागली आहे.
प्रोडक्शन हाऊसच्या कार्यालयाला आग
पूनम चेंबर्सच्या दुसऱ्या मजल्यावरील प्रोडक्शन हाऊसच्या कार्यालयाला आग लागली. सुरुवातीला एक छोटा स्पह्ट झाल्याचा आवाज लोकांनी ऐकला आणि त्यानंतर आगीचा भडका उडाला आणि वाऱ्याच्या वेगाने आगीने भीषण रूप धारण केले.