थोरला भाऊ जिल्ह्यात आल्यावर धाकला भाऊ म्हणून सत्कार- विनायक मेटे

महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसंग्रामने महाजनादेश यात्रेचे जे स्वागत केले याबद्दल मी शिवसंग्राम व आ. विनायक मेटे यांचे आभार मानतो. हा बीड जिल्हा मुंडे साहेबांचा जिल्हा आहे. शिवसंग्रामने केलेल्या स्वागताने मी भारावलो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी शिवसंग्राम आयोजित स्वागत समारंभाप्रसंगी दिली. काकडहिरा येथे शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांच्या वतीने महाजनादेश यात्रा व मुख्यमंत्र्यांची स्वागत सभा दि. २६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी आ.विनायक मेटे यांनी थोरला भाऊ जिल्ह्यात आल्यावर धाकला भाऊ म्हणून सत्कार आणि आभार मानल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पाच वर्षातील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी राज्यभरात महाजनादेश यात्रा काढत आहेत. यातील पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यांतर्गत ते बीड जिल्ह्यात आलेले होते. महाजनादेश यात्रा व मुख्यमंत्र्यांच्या स्वागतसमयी आ. विनायकराव मेटे यांच्या शिवसंग्रामतर्फे जिल्हाभरातील हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. काकडहिरा येथे शिवसंग्रामने जबरदस्त शक्तीप्रदर्शन केले. मुख्यमंत्र्यांनी शिवसंग्राम महायुतीचा घटक असल्याचे सांगत भारावलो असल्याचे नमूद केले. याप्रसंगी आ.विनायकराव मेटे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करताना केलेल्या विकासकामांबाबत आभार मानत बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत शासनाने भरघोस मदत केलेली आहे. मात्र यावर्षीही दुष्काळी परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे आ. विनायकराव मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना निदर्शनास आणून दिले. या स्वागत समारंभास हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, महिला व युवकांची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या