
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याच्या अंदाजामुळे पुणेकरांवर पुन्हा एकदा पाणीकपातीचे संकट ओढवण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. जलसंपदा विभागाने पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, तसेच एमआयडीसी क्षेत्रात १५ टक्के पाणीकपात करण्याचे आदेश दिले असून, येत्या काही महिन्यांत शहरातील पाणीपुरवठा अधिकच अनियमित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हवामान विभागाने २०२६ साली ‘एल-निनो’ आणि ‘आयओडी’च्या प्रभावामुळे मान्सून कमी राहण्याचा इशारा दिला आहे. या पाश्र्वभूमीवर ३१ जुलैपर्यंत उपलब्ध पाणीसाठा तगविण्यासाठी दरमहा कपातीचे धोरण राबविले जाणार आहे. म्हणजेच पावसाळा पूर्ण जोमात येईपर्यंत पुणेकरांना कमी पाण्यात भागवावे लागणार आहे.
जलसंपदा विभाग व महापालिका प्रशासनाची शुक्रवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यात दोन्ही विभागांच्या विविध विषयांवर चर्चा होणार असून, पुढील धोरण निश्चित होणार आहे.
नवलकिशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका
यावर महापालिका आयुक्त नवलकिशोर राम म्हणाले, ‘शहरात सध्या लोकेशननिहाय पाणीपुरवठा होत असून, काही भागांत पाण्याची रेलचेल, तर काही ठिकाणी तुटवडा अशी विषम परिस्थिती आहे.’ योग्य नियोजन केल्यास कपात करूनही पाणीपुरवठा शक्य असल्याचा दावा प्रशासन करीत असले, तरी वास्तव मात्र वेगळेच चित्र दाखवत आहे. शहरात तब्बल साडेतीन लाख नळजोडण्या असून त्यापैकी दीड लाख अनधिकृत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याशिवाय २५ टक्के पाणी गळती आणि चोरीमुळे वाया जात आहे. एकीकडे कपातीचे आदेश आणि दुसरीकडे पाण्याचा बेफिकीर अपव्यय यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, खडकवासला धरण साखळीत सध्या १३.२० टीएमसी (४५.२९ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साठा किंचित जास्त असला, तरी वाढत्या लोकसंख्येमुळे आणि अनियमित वापरामुळे परिस्थिती गंभीर बनू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सध्या – पुणे महापालिका दररोज सुमारे १५६० एमएलडी पाणी उचलत असून, हे प्रमाण १३०० एमएलडीपर्यंत खाली येणार आहे. – दरमहा वापरले जाणारे १.६५ टीएमसी पाणी १.४ टीएमसीवर – आणण्याचा प्रशासनाचा मानस आहे.


























































