
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने सद्यस्थितीत 1077907 दशलक्ष लिटर पाणी झाले आहे. मुंबईला दररोज होणारा 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पाहता हे पाणी एप्रिल 2026 पर्यंत पुरणारे आहे. विशेष म्हणजे आजच्या जलसाठ्याने गेल्या तीन वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहे. गेल्या दोन वर्षांत 12 जुलैचा जलसाठा पाहता आजचा जलसाठा तिप्पट आहे.
मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे तलावक्षेत्रात जोरदार पाऊस होण्याची गरज असते. गेल्या काही वर्षांपासून जून पूर्ण कोरडा जात असल्यामुळे पालिकेला 10 ते 15 टक्के पाणीकपात करावी लागते. मात्र या वर्षी सुरुवातीपासून तलाव क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे समाधानकारक जलसाठा जमा झाला आहे. दरम्यान, मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 1 ऑक्टोबर रोजी 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणी जमा होणे गरजेचे असते. या साठ्यानुसार मुंबईच्या वर्षभराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाते.
12 जुलैचा धरणांतील पाणी
- अप्पर वैतरणा – 170035 दशलक्ष लिटर
- मोडक सागर – 128925 दशलक्ष लिटर
- तानसा – 115836 दशलक्ष लिटर
- मध्य वैतरणा – 1799493 दशलक्ष लिटर
- भातसा – 4666116 दशलक्ष लिटर
- विहार – 13450 दशलक्ष लिटर
- तुळशी – 4051 दशलक्ष लिटर
गेल्या तीन वर्षांतील 12 जुलैची स्थिती
सातही तलावांत मिळून आज 1077907 दशलक्ष लिटर म्हणजेच 74.47 टक्के जलसाठा जमा झाला आहे. 2023 मध्ये हा जलसाठा 400143 दशलक्ष लिटर म्हणजेच केवळ 27.65 टक्के होता. तर 2024 मध्ये आजच्याच दिवशी 329991 दशलक्ष लिटर म्हणजेच केवळ 22.80 टक्के जलसाठा जमा होता.