पाईपलाईन गंजून फुटली: आनंदव्हाळ, कर्लाचाव्हाळ ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

गंजून फुटलेल्या पाईपलाईनमुळे आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ येथील काही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पिण्यासाठी लागणारे पाणी विकत आणण्याची वेळ कुटुंबियांवर आली आहे. ग्रामपंचायतकडे तक्रार केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. असे सांगत काही ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी यांची भेट घेत तक्रार केली असून सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे.

आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायत मार्फत नळपाणी योजनेतून गावाला पाणीपुरवठा केला जातो. काहीजणांच्या स्वतःच्या विहिरी आहेत, त्यामुळे अनेक कुटुंब या नळपाणी योजनेचे पाणी वापरत नाही. मात्र, काही कुटुंब पाईपलाईनने केलेल्या योजनेतून पाण्याचा वापर करतात. पाईपलाईन जुनी झाल्याने पूर्णतः गंजून गेली आहे. काही ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने पाणीही वाया जाते. मात्र, ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे. तोंडी तक्रार केली असता आम्हाला लेखी तक्रार द्या असे ग्रामपंचायतकडून सांगण्यात आले. त्यानंतर येथील ग्रामस्थ सिद्धेश साबाजी माळकर यांनी चारवेळा लेखी तक्रार दिली. लेखी तक्रारीचीही दखल न घेता उलट उडवाउडवीची देण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांना चौके येथून पाणी विकत आणावे लागत आहे. पाण्यासाठी हाल होत आहेत. तरी शारीरिक त्रास होत असून आर्थिक नुकसानही होत आहे. असे तक्रारीत म्हटले आहे.

माळकर कुटुंबीयांनी पाण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार यासह सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहेत. पाईपलाईनची पाहणी करून लवकरात लवकर आम्हाला पाणी मिळावे अशी मागणी यांनी केली आहे.