गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात टँकरची संख्या पाच पटीने वाढली

64

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यातील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली असून मागील आठवडय़ाच्या तुलनेत या आठवडय़ात राज्याच्या ग्रामीण भागातील टँकरची संख्या चारशेंनी वाढली आहे आणि राज्यातल्या धरणातील पाणीसाठा 17.24 टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला राज्यात फक्त 1100 टँकर्सच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात होता, पण यंदा मे महिन्यात आताच्या घडीला घडीला राज्यात पाच हजारांहून अधिक टँकरवर वाडय़ा-वस्त्यांवरील लोकांची पिण्याच्या पाण्याची तहान भागवली जात आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात राज्यात टँकरची संख्या पाच पटीने वाढल्याचे दिसून येत आहे.

राज्यात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. विहिरी आटत चालल्या आहेत. धरणातील पाण्याची साठा झपाटय़ाने खाली चालला असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात राज्यात केवळ 1 हजार 164 टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात होता, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परिस्थिती अधिक बिकट झाल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

मराठवाड्याला सर्वाधिक फटका
राज्यातील भीषण पाणीटंचाईचा सर्वात मोठा फटका मराठवाडय़ाला बसला आहे. संभाजीनगरमध्ये सध्या 1 हजार 48 टँकरने पाणीपुरवठा होत आहे. त्यापाठोपाठ बीडमध्ये 830, जालनामध्ये 507 तर धाराशीवमध्ये 134 टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा होत आहे.

ठाणे-पालघरमधील मागणी वाढली
मुंबईजवळच्या ठाणे व पालघर जिह्यातील टँकरची संख्याही वाढली आहे. ठाण्यात सध्याच्या घडीला 31, पालघरमध्ये 34 टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा सुरू आहे. तर रायगडमध्ये 23 तर रत्नागिरीत नऊ टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवले जात आहे.

टँकरची संख्या चारशेनी वाढली
मागील आठवडय़ात राज्याच्या वाडय़ा-वस्त्यांवर 4 हजार 774 टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा सुरू होता. आता या आठवडय़ात राज्यात टँकरची संख्या 5 हजार 174 वर आली आहे. मागील आठवडय़ाच्या तुलनेत आता टँकरची संख्या चारशेनी वाढल्याचे या अधिकऱ्याने सांगितले.

पाणी पुरवणाऱ्या टँकरची संख्या
6 मे 2019 – 5 हजार 174
26 एप्रिल 2019 – 4 हजार 774
7 मे 2018 – 1 हजार 164

राज्यातल्या धरणातील पाण्याचा साठा – 17. 24 टक्के

मोबदला वाढवला

त्यामुळे राज्यातल्या ग्रामीण भागातील जनतेची पाण्याची तहान भागावण्यासाठी ताब्यात घेतलेल्या खासगी विहिरींच्या मालकांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मोबदल्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विहिरीतून पाणी उचलण्याचे दर 450 रुपये ते 600 रुपये केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या