
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नाटो (NATO) सदस्य देशांबाबत एक मोठे आणि आक्रमक विधान केले आहे. “इराणविरुद्धच्या या युद्धात अमेरिकेला नाटो किंवा इतर कोणत्याही देशाच्या मदतीची गरज नाही, अमेरिका एकटीच समर्थ आहे,” अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
आपल्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ट्रम्प यांनी माहिती दिली की, नाटोमधील बहुतांश देशांनी इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईत सहभागी होण्यास नकार दिला आहे. मात्र इराणकडे अण्वस्त्रे नसावीत या मुद्द्यावर हे सर्व देश सहमत असल्याचेही त्यांनी नमूद केले. नाटो देशांची ही भूमिका म्हणजे एक मूर्खपणाची चूक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी नाटो संघटनेवर टीका करताना तिला ‘वन-वे स्ट्रीट’ असे संबोधले. ते म्हणाले, “अमेरिका दरवर्षी या देशांच्या सुरक्षेसाठी प्रचंड पैसा खर्च करते, पण जेव्हा अमेरिकेला गरज असते, तेव्हा हे देश मागे हटतात. मात्र यामुळे मला नवल वाटले नाही.” अमेरिकेने इराणविरुद्ध मोठी लष्करी यश संपादन केले असून आता आम्हाला जपान, ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण कोरियासारख्या देशांच्या मदतीचीही आवश्यकता उरलेली नाही, असा दावा त्यांनी केला.


























































