मनोज जरांगे पाटील यांचे क्लेश सरकारने संपवलं असेल तर त्यांचेही अभिनंदन – संजय राऊत

सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या आणि त्या मान्य झाल्या म्हणून जरांगे पाटील आणि सरकार समाधानी असेल तर आम्हीही समाधानी आहोत असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच जरांगे पाटील यांचे क्लेश सरकारने संपवलं असेल तर त्यांचेही अभिनंदन असेही संजय राऊत म्हणाले.

आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात मराठी बांधव आले. आरक्षणासंदर्भात त्यांच्या मागण्या होत्या. पावसात, चिखलात जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक आंदोलन करत होते. काल सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि मागण्या मान्य झाल्या म्हणून जरांगे पाटील आणि सरकार समाधानी असेल तर आम्हीही समाधानी आहोत. जर शेवट गोड झालेला आहे आणि गुलाल उधळला, जसा नवी मुंबईतही गुलाल उधळला होता. आता नवी मुंबईत आणि मुंबईत उधळलेला गुलाल यात काय फरक आहे यात काय तफावत आहे हे मला अभ्यासक म्हणून पहावं लागेल, पण यात आता आम्ही जात नाही. स्वतः जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. फडणवीसांनी जो तोडगा काढला आणि जरांगे पाटील यांचे समाधान झाले असेल तर त्यांचे सगळ्यांचे समाधान आहे. जरांगे पाटील यांनी पाच दिवस उपोषण केले त्यामुळे त्यांचे क्लेश सरकारने संपवलं असेल तर आम्ही सरकारचेही अभिनंदन करतो असे संजय राऊत म्हणाले.

छगन भुजबळ यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. जोपर्यंत पूर्ण अध्यादेश हाती येत नाही तोवर कुणीही यावर आकांततांडव करू नये. सर्व समाज हे मराठी बांधव आहेत. आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जर आम्ही मान्य करत असू तर मराठी माणसांची भक्कम एकजूट जातीपातीच्या मुद्द्यावर कुणीही तोडण्याचा प्रयत्न करू नये. हजारोंच्या संख्येने हे मराठी बांधव मुंबईत आले आणि आम्ही त्यांचं स्वागत केलं. ही मुंबई तुमचीच आहे सांगितलं. त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाने शिवसैनिकांनी आणि राज ठाकरे यांच्या आवाहनाने मनसैनिकांनी प्रचंड काम केलं असे संजय राऊत म्हणाले.

भाजपचे नेत अजूनही जरांगे पाटील यांची कुचेष्टा करत आहेत. भाजपचं पडद्यामागचं म्हणणं वेगळं आहे. त्यांच्या दृष्टीने आम्ही कसं जरांगे पाटील यांना बाहेर काढलं पहा. जोपर्यंत अध्यादेश येत नाही तोवर त्यावर बोलणे योग्य नाही. यावेळी स्वतः जरांगे पाटील समाधानी आहेत. कारण यातना आणि क्लेश त्यांच्या मनाला होत होते. त्यांचा जीव पणाला लागला होता. म्हणून सरकारने तोडगा काढून त्यांचं उपोषण सोडवायला लावलं असेल आणि त्यांचे प्राण वाचवले असतील तर त्याचे स्वागत केले पाहिजे. भाजप हा दुतोंड्या गांडुळासारखा पक्ष आहे. जेव्हा जरांगे पाटील इथे तेव्हा भाजपची भाषा वेगळी होती, ती कोणत्या हीन प्रकारची भाषा होती ती एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐकायला पाहिजे होती. आज मोदी रडतात की कुणीतरी त्यांच्या आईला शिव्या घातल्या. इथे जरांगे पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात भाजप नेते कोणती भाषा वापरत होते. याचं चित्रण मोदींनी पहायला पाहिजे. त्यामुळे मी भाजपला दुतोंडी गांडूळ का म्हणतो हे आपल्याला कळेल. जरांगे पाटील जेव्हा आले ते भाजपने टोकाचा दोष पसरवण्याचा प्रयत्न केला. ज्या टोकाची घाणेरडी भाषा वापरली, एक देवेंद्र फडणवीस सोडले तर सगळ्यांनी ही भाषा वापरली. मी देवेंद्र फडणवीस यांच्या संयमांच कौतुकसुद्ध करेन. आंदोलकांनी फडणवीसांवर जी जहरी भाषेत टीका केली तरी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी अजिबात संयम सोडला नाही, हे कौतुकास्पद आहे. पण त्याच वेळी भाजपचे बाहेरून आलेले नेते त्यांनी ज्या प्रकारे जरांगे पाटील विषयी भाषा वापरली, ती भाषा समर्थनीय नाही. आणि त्यानंतर लगेच त्याचं श्रेय घ्यायला आले. मग नक्की तुम्ही कोण आहात तुमची भूमिका काय आहे? हे सांगा असेही संजय राऊत म्हणाले.

उपोषण संपलं आहे आणि आंदोलन संपलं आहे. 8 पैकी 6 मागण्या मान्य झाल्या आहेत. पण मराठा समाजाचे जे नेते आहेत, जे आधी आंदोलन करत होते, कोर्टात लढत होते त्यांच्या भूमिका वेगळ्या आहेत. यातून आम्हाला काही मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. जोपर्यंत अध्यादेश हाती येत नाही तोवर यावर काही बोलणे योग्य नाही.

हा निर्णय घेण्याशिवाय देवेंद्र फडणवीसांकडे दुसरा पर्याय नव्हता. हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी काल जे निर्णय घेतले ते निर्णय त्यांना घ्यावेच लागणार होते. न्यायालयाचा दबाव होता, न्यायालयाच्या माध्यमातूनही हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झाला. आणि ते चुकीचे होतं असं मला वाटत नाही.

वोट चोरी हा बॉम्ब आहे. पण राहुल गांधी यांचं संशोधन सुरू आहे. राहुल गांधी पुराव्याशिवाय बोलत नाही. पुढील काही महिन्यात देशात राजकीय परिवर्तन होईल. त्या परिवर्तनाला हा हायड्रोजन बॉम्ब कारणीभूत ठरेल. मोदी आज चीनमध्ये होते, आज जपानमध्ये आहेत. हे त्यांचं अखेरचं विदेशी पर्यटन करून घेत आहेत. देशात आले आणि माझ्या आईला शिव्या घातल्या म्हणून रडू लागले. देशाच्या प्रश्नावर बोला, अनेक प्रश्न आहेत रडताय कशाला? कुणीही त्या यात्रेत नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या आईविषयी अपशब्द काढले नाहीत. 17 दिवसांची यात्रा मी सुद्धा फॉलो केली. शेवटच्या दोन दिवसांतही आम्ही होतो. कुठेही अशा प्रकारचा त्यांच्या आई संदर्भात अपशब्द वापरले नाही. स्वतः राहुल गांधी हे सुसंस्कृत आणि संयमी नेते आहेत असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.