आपण सरकारला 29 ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत जर मराठा आरक्षण जाहीर केलं आणि सग्यासोयऱ्यांचा प्रश्न निकाली काढला तर ठीक आहे. नाही तर येत्या 29 ऑगस्टला तुम्ही सर्व जण अंतरवाली सराटी मध्ये या. आपण तेव्हाच ठरवू आपण लढायचं की यांना पाडायचं, असे मत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जारंगे – पाटील यांनी व्यक्त केले.
पश्चिम महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीची सुरुवात सोलापूर शहरातून करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आयोजित केलेल्या भव्य मेळाव्यामध्ये जरांगे पाटील बोलत होते. जरांगे यांनी तासभर केलेल्या भाषणात आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करत राजकारण्यांचा चांगलाच समाचार घेतला. पश्चिम महाराष्ट्राला कधीही कमी लेखू नका. त्यातल्या मराठ्यांच्या तर नादाला लागू नका. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही, आता विधानसभा निवडणुकीतच ताकद दाखविण्याची गरज आहे. मराठा समाजाने आता आपल्या हक्काची लढाई आणखी तीव्र केली पाहिजे, असे आवाहन मनोज जरांगे – पाटील यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर ,राज ठाकरे तसेच नारायण राणे आणि छगन भुजबळ यांच्यावरही जरांगे पाटील टीकास्त्र सोडले. राजकारणातील हे नेते मराठा समाजाचे विरोधक आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचा जो कोणी उमेदवार असेल त्यालाच मराठा समाजाने मतदान करावे, असे आवाहनही जरांगे यांनी केले. भाजपच्या लोकांनी एकाचे तीन क्रांती मोर्चे केले आहेत. त्यामुळे त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. आता मराठा समाजाच्या समन्वयकांना फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. काहीजण सत्तेसाठी पावसात भिजतात ,आपण जातीसाठी पावसात भिजू ,असे ते म्हणाले. 70 हजार कोटींचा घोटाळा करणारे सत्तेत असल्याचे सांगत नाव न घेता जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधाला. भुजबळ हे बोगस समितीचे देशाचे अध्यक्ष असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. नितेश राणे यांच्यावरही त्यांनी टीका केली. मराठा समाज संयमी असल्यामुळेच आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या आंदोलन टिकून राहिले आहे. मराठा समाजाने धीर धरावा. शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले.
महापुरुषांना अभिवादन!
मनोज जरांगे – पाटील यांचे बुधवारी दुपारी तुळजापूर येथून सोलापुरात आगमन झाले. सर्वप्रथम त्यांनी सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ते पुना नाका येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात पोहोचले. या ठिकाणी सकल मराठा समाजाच्यावतीने त्यांचा क्रेनद्वारे पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. त्यानंतर शांतता रॅलीला सुरुवात झाली.
कोकणात एक जण केविलवाणीपणे बघतो
कोकणात एक जण केविलवाणीपणे बघतो, असे म्हणत जरांगे -पाटील यांनी नारायण राणे यांना टोला हाणला. 2024 मध्ये राज्यात कोणाला सत्तेत बसवायचे हे मराठा समाज ठरवणार. मी मॅनेज होणारा कार्यकर्ता नाही म्हणून माझी विरोधकांकडून बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. छगन भुजबळ आजकाल दिसत नाही. मी जाण्या अगोदर तो भुजबळ तेथे जाऊन येतो. फडणवीस आणि भुजबळ ज्या ज्या मतदारसंघात जातील तेथील उमेदवार तुम्ही पाडा ते काल माढ्यात येऊन गेले तर माढ्यातला उमेदवार ही तुम्ही पाडा. फडणीसवर मी टीका करतो कारण फडविसांनी अंतरवाली सराटीत गोळीबार केल्यानंतर पोलिसांची बाजू घेतली. भगिनींवर गोळ्या झाडण्यात आल्या त्यांचा आक्रोश एकाला कोणीही नव्हते बंदुकीच्या दस्त्याने माता माऊलींची डोकी फोडली. त्यांची पिलावळ मला म्हणताहेत फडणवीसांच्या विरोधात बोलणे बंद करा. माझी जात आणि माझी लेकरं मोठी झाली पाहिजे. खानदानी मराठी अवलाद आता पक्षाचा प्रचार करणार नाहीत. जातीचाच प्रचार करणार तुम्ही नेता आणि पक्षाला बाप मानता. नादाला लागाल तर राजकीय सुपडा साफ करू. तू कोण 96 कुळी मराठा आरक्षणाला विरोध करणारा, असा सवालही त्यांनी केला.
मराठा समाजाची शान जाऊ देणार नाही
मराठा समाजाची शान आणि शक्ती वाढवायचे असेल तर दिलेल्या उमेदवार मराठा समाजाने ताकतीने निवडून आणला पाहिजे. समाजान ठरविलेल्या एकाच उमेदवाराच्या बाजूने मराठा समाजाने विधानसभा निवडणुकीत उभे राहिले पाहिजे. मराठा, धनगर, दलितांनी, मुस्लिमांना वाटते आपली जात आणि आपली लेकरं मोठी झाली पाहिजे. यासाठी प्रत्येक मराठ्याने आजपासून काम सुरू केली पाहिजे, असेही जरांगे म्हणाले.