
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या खिशावर उमटू लागले आहेत. पश्चिम आशियातील तणावामुळे गॅस पुरवठा खंडित होण्याचे संकट उभे ठाकले असून, याचे गंभीर परिणाम नागपूरसह महाराष्ट्राच्या विविध भागात दिसू लागले आहेत. नागपूरमध्ये गो गॅसने आपल्या एलपीजी स्टेशनवर वाहनांसाठी लागणाऱ्या गॅसच्या दरात प्रति लिटर 8 रुपये 42 पैशांची भरमसाठ वाढ केली आहे. या दरवाढीमुळे वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
केवळ एलपीजीच नव्हे, तर सीएनजीच्या दरांनीही उच्चांक गाठला असून नागपूरमध्ये सीएनजीचे दर आता 64 रुपये 98 पैशांवर पोहोचले आहेत. याचा सर्वाधिक फटका शालेय वाहतुकीला बसला आहे. आतापर्यंत स्कूल बस आणि स्कूल व्हॅनला गो गॅसकडून प्रति लिटर 12 रुपये सबसिडी दिली जात होती, मात्र आता ही सबसिडी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. परिणामी, शालेय वाहनांसाठी गॅसचे दर थेट 20 रुपयांनी महागले असून, यामुळे पालकांच्या खिशावरही शैक्षणिक वाहतुकीचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, इंधनाच्या टंचाईमुळे गॅस कंपन्यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील बीपीसीएलच्या शिक्रापूर प्लांटमध्ये आणि चाकणमधील एचपीसीएलच्या प्लांटमध्ये व्यावसायिक वापराचे सिलिंडर देणे तात्पुरते बंद करण्यात आले आहे. घरगुती वापराच्या गॅसचा पुरवठा विस्कळीत होऊ नये आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा, या उद्देशाने व्यावसायिक सिलेंडर्सचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डिलर्सना त्यांच्या गाड्या या प्लांटमध्ये न पाठवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. इराणमधील वाढती जीवितहानी आणि जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता पाहता, आगामी काळात इंधनाचे हे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


























































