
दोन वेळचा टी-20 वर्ल्ड कप जगज्जेता वेस्ट इंडिज संघ क गटातील आपल्या अखेरच्या सामन्यात इटलीविरुद्ध मैदानात उतरणार आहे. इटलीचे स्पर्धेतील आव्हान संपले असले तरी त्यांना झुंजवण्यासाठी त्यांनीही तयारी केली आहे. या तयारीत कोणता संघ सरस कामगिरी करतो ते पाहण्याची संधी कोलकातावासीयांना लाभणार आहे.
विजयी हॅटट्रिकसह सुपर एटमध्ये पोहोचलेला वेस्ट इंडिज 23 फेब्रुवारीला मुंबईत झिम्बाब्वेविरुद्ध, 26 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि 1 मार्चला याच ईडन गार्डन्सवर हिंदुस्थानविरुद्ध महत्त्वाची लढत खेळणार आहे. त्यामुळे कोलकात्याच्या खेळपट्टीशी पूर्णपणे जुळवून घेणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरणार आहे.
कर्णधार शाय होप योग्य वेळी फॉर्मात परतल्याने विंडीजची ताकद वाढलीय. इंग्लंडविरुद्ध शून्यावर बाद झाल्यानंतर त्याने नेपाळविरुद्ध 44 चेंडूत नाबाद 61 धावांची खेळी साकारत आत्मविश्वास परत मिळवला. शिमरॉन हेटमायरने मधल्या फळीत आपली दहशत निर्माण केलीय तर शेरफेन रदरपर्ह्डने अखेरच्या षटकांत प्रभावी फटकेबाजी करत सामना संपवण्याची भूमिका उत्तम पार पाडली. गोलंदाजीत मॅथ्यू पर्ह्ड, रोस्टन चेस आणि गुडाकेश मोती यांनी मधल्या षटकांत धावांना लगाम घालत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव कायम ठेवला आहे.

























































