पश्चिम बंगालमधील कोलकातामधील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या अत्यंत क्रूर, निंदनीय घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर जिह्यातील डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवून मोर्चा काढला. यावेळी नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, नगर शहरासह पाथर्डी, इचलकरंजी येथेही डॉक्टरांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.
या घटनेचा मुश्रीफ यांनीही निषेध केला. हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. त्वरीत तपास करून नराधमांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करीत डॉक्टरांच्या संपामुळे गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत, याकडेही मंत्री मुश्रीफ यांनी लक्ष वेधले. तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेसंबंधी कायदा मंजूर होण्यासाठी केंद्र सरकार आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे पाठपुरावा करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. शहराच्या प्रमुख मार्गांवरून निघालेला मोर्चा कावळा नाका येथे जाऊन विसर्जित करण्यात आला. एक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. मोर्चामध्ये मार्ड, अस्मी, आयएमए, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, मॅग्मो, नार्ंसग असोसिएशन, फिजिओथेरपी असोसिएशन आदी संघटनांचे जिह्यातील हजारांहून अधिक सदस्य, तसेच वैद्यकीय महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
कोलकाता येथील भयंकर घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी संप सुरू केला आहे. नगर येथे इंडियन मेडिकल असोसिएशन, डेंटल असोसिएशन, नगर होमिओपॅथिक असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, एम.आर. असोसिएशन अशा विविध वैद्यकीय संघटनांनी नगर कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चामध्ये डॉ. चंद्रवदन मिश्रा, डॉ. सुरेंद्र रच्चा, डॉ. मुकुंद तांदळे, डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. ज्योत्स्ना डवले, डॉ. नयना मिश्रा, डॉ. सोनल बोरुडे, डॉ. नरेंद्र वानखडे, डॉ. अमित करडे, डॉ. सचिन पांडुळे, डॉ. अर्जुन शिरसाठ, ऍड. श्याम आसवा, डॉ. रणजित सतरे, डॉ. महेश वीर यांच्यासह शहरातील डॉक्टर्स व मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, दोषींना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, केंद्र सरकारने डॉक्टर्स आणि स्टाफवर होणाऱ्या हल्ल्याबाबत कठोर कायदा आणावा, डॉक्टरांना संरक्षण कवच द्यावे, अशी मागणी आयएमचे अध्यक्ष चंद्रवदन मिश्रा यांनी केली.
इचलकरंजीत मूक मोर्चा
कोलकाता घटनेच्या निषेधार्थ इचलकरंजी शहरातील खासगी वैद्यकीय सेवा 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आल्या. तर, सकाळी मेडिकल असोसिएशन ते प्रांत ऑफिसपर्यंत वैद्यकीय संघटनांतर्फे मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रांत कार्यालयास निवेदन देण्यात आले. मोर्चामध्ये डॉ. शरद मिठारी, डॉ. राजेश कुंभार, डॉ. गोविंद ढवळे, डॉ. एस. पी. मर्दा, डॉ. राजन फुटाणे, डॉ. चैताली मगदूम, डॉ. संदेश पाटील सहभागी झाले होते.
पाथर्डी तहसीलवर मोर्चा
तालुका वैद्यकीय असोसिएशनच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून कोलकाता येथील घटनेचा निषेध करण्यात आला. मोर्चामध्ये प्रथमच शहर व तालुक्यातील सर्व डॉक्टर्स, औषध विक्रेते व लॅब व्यावसायिक आपले व्यवसाय पूर्ण बंद ठेवून व काळ्या फिती लावून बंदमध्ये सहभागी झाले होते. मोर्चाची सुरुवात उपजिल्हा रुग्णालय येथून झाली. संपूर्ण शहरातून मोर्चा काढत तो तहसील कार्यालयावर नेण्यात आला.