पश्चिम रेल्वेवर तीन वर्षांत 165 लोकल फेऱ्या वाढणार, 5 लाख प्रवाशांची सोय होणार; जोगेश्वरी टर्मिनससह विविध प्रकल्प फास्ट ट्रकवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल प्रवास नजीकच्या काळात सुकर होण्याची चिन्हे आहेत. जोगेश्वरी टर्मिनस, बोरिवली ते विरार आणि विरार ते डहाणूदरम्यान अतिरिक्त मार्गिका अशा विविध प्रकल्पांची कामे सध्या फास्ट ट्रकवर आहेत. ही कामे पूर्ण होऊन पुढील तीन वर्षांत चर्चगेट ते डहाणूपर्यंत लोकल ट्रेनच्या अतिरिक्त 165 फेऱयांची भर पडणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेची प्रवासी क्षमता 5 लाखांनी वाढणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी टर्मिनसचे काम ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. विरार ते डहाणूदरम्यान तिसऱया आणि चौथ्या मार्गिकेचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. अतिरिक्त दोन मार्गिकांचे काम पूर्ण झाल्यानंतर विरार-डहाणू दरम्यानच्या लोकल फेऱयांची संख्या दुपटी-तिपटीने वाढणार आहे. बोरिवली-विरार दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांच्या कामानेही वेग घेतला आहे. वसई कोचिंग टर्मिनल व इतर प्रकल्प पुढील 6 महिन्यांत ते 3 वर्षांत पूर्ण होतील.

विरार ते वांद्रे धीम्या गतीच्या 15 डबा गाडय़ा धावणार

सद्यस्थितीत विरार ते अंधेरी स्थानकांदरम्यान धीम्या गतीच्या 15 डब्यांच्या 211 लोकल फेऱया चालवण्यात येत आहेत. धिम्या मार्गावरील प्रवाशी क्षमता वाढवण्याच्या हेतूने चालू वर्षाअखेरीपर्यंत वांद्रे स्थानकापर्यंत 15 डबा लोकल सेवेचा विस्तार केला जाणार आहे. धिम्या मार्गावरील अनेक स्थानकांतील प्रवाशांना सकाळ व सायंकाळी होणाऱया गर्दीपासून दिलासा मिळणार आहे.

सीएसएमटी ते विद्याविहार उद्या 5 तासांचा ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या काळात धिम्या लोकल सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान जलद मार्गावर धावणार आहेत. सीएसएमटी येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 दरम्यान सुटणाऱया डाऊन धीम्या लोकल विद्याविहारपर्यंत डाऊन जलद मार्गावरून वळविण्यात येणार आहेत. तसेच घाटकोपर येथून सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 दरम्यान सुटणाया अप धीम्या लोकल विद्याविहार ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरून वळविण्यात येतील. हार्बरवर पनवेल-वाशीदरम्यान सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत ब्लॉक असेल.