
<<< मंगेश मोरे >>>
रेल्वे स्थानकांतील उद्घोषणांमुळे (अनाऊन्समेंट) होणारे ध्वनिप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पश्चिम रेल्वेने अनोखे पाऊल उचलले आहे. ‘स्थानकात जेवढे प्रवासी, तेवढीच आवाजाची तीव्रता’ असा फॉर्म्युला सेट केलेले अत्याधुनिक स्पीकर्स प्लॅटफॉर्म, ब्रीजवर जागोजागी बसवले जाणार आहेत. त्यामुळे आता गर्दीनुसार उद्घोषणांचा आवाज कमी-जास्त होणार आहे.
उपनगरी रेल्वेची प्रवासी सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू असते. या काळात सतत मोठ्या आवाजात उद्घोषणा केल्या जातात. त्याचा प्रवाशांना फायदा कमी आणि ध्वनिप्रदूषणाची डोकेदुखी जास्त सहन करावी लागते. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने स्थानकांत विविध सुविधांचा विस्तार करताना उद्घोषणांपासून होणारे ध्वनिप्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर ‘अमृत भारत’ स्टेशन योजनेअंतर्गत स्थानकांवर उद्घोषणा प्रणालीसाठी जुने हॉर्न आणि बॉक्स प्रकारचे स्पीकर्स हटवून त्याजागी अत्याधुनिक ‘आयपी स्पीकर्स’ बसवले जात आहेत. सध्या सात स्थानकांवर प्लॅटफॉर्म, फुटओव्हर ब्रीज आणि स्थानकांच्या एण्ट्री-एक्झिट पॉइंट्सवर दर 15 ते 20 मीटर अंतरावर ‘आयपी स्पीकर्स’ सेट केले आहेत. सात स्थानकांतील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर नजीकच्या काळात उर्वरित स्थानकांत ‘आयपी स्पीकर्स’ बसवले जातील, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली.
नव्या प्रणालीची वैशिष्ट्ये
नव्या स्पीकर्सच्या कनेक्टिव्हिटीसाठी इथरनेट आधारित आयपी नेटवर्क वापरले जात आहे. त्यात उद्घोषणांचा आवाज समायोजित करण्याची सुविधा आहे. ‘नॉइज सेन्सिंग मायक्रोफोन’ परिसरात इतर गोष्टींचा किती आवाज आहे, याचा अंदाज घेऊन उद्घोषणांच्या आवाजाची पातळी समायोजित करतात.
जेव्हा बाहेरील वाहने, त्यांचे हॉर्न, ट्रेनचा आवाज इत्यादींसारखे सभोवतालचे आवाज जास्त असतात तेव्हा प्रवाशांना सूचना नीट ऐकू येण्यासाठी उद्घोषणांचा आवाज आपोआप वाढतो. त्याचप्रमाणे रात्री इतर गोष्टींचा आवाज कमी असताना उद्घोषणांच्या आवाजाची पातळी कमी राखली जाते.
पहिल्या टप्प्यातील स्थानके
नव्या प्रणालीअंतर्गत पहिल्या टप्प्यात मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, लोअर परळ, प्रभादेवी, जोगेश्वरी आणि मालाड या स्थानकांवर ‘आयपी स्पीकर्स’ बसवले जाणार आहेत.