
घनदाट जंगल, समृद्ध वन्यजीवन आणि ऐतिहासिक वारसा यांचे अनोखे मिश्रण म्हणजे रणथंबोर. राजस्थानच्या सवाई माधोपुर जिल्ह्यात वसलेले रणथंबोर राष्ट्रीय उद्यान देश-विदेशातील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. सुमारे ४०० चौ. किमी क्षेत्रफळात पसरलेल्या या उद्यानाला १९८० साली राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. येथे रॉयल बंगाल वाघ, बिबट्या, अस्वल, हरणे तसेच अनेक दुर्मिळ वन्यप्राणी नैसर्गिक अधिवासात पाहायला मिळतात.
रणथंबोरमधील जीप आणि कँटर सफारी हा पर्यटकांसाठी मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. दाट जंगलातून जाताना वाघांचे दर्शन होणे हा प्रत्येक पर्यटकासाठी अविस्मरणीय अनुभव ठरतो. निसर्गाच्या सान्निध्यात मिळणारा हा थरार रणथंबोरला विशेष बनवतो.
पदम तलाव आणि जोगी महलचे आकर्षण
रणथंबोरमधील पदम तलाव वन्यप्राणी दर्शन आणि छायाचित्रणासाठी प्रसिद्ध आहे. तलावाच्या काठावर असलेले प्राचीन अवशेष या परिसराला अधिक मोहक बनवतात. याच परिसरात असलेला जोगी महल पूर्वी जयपूरच्या राजघराण्याचा विश्रामस्थळ होता. आज हा महल त्याच्या निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. महालाजवळील विशाल वडाचे झाड हे देखील एक खास आकर्षण आहे.
निसर्ग, इतिहास आणि आलिशान अनुभव यांचे अद्वितीय मिश्रण असलेले रणथंबोर हे एकदा तरी अनुभवावे असे पर्यटनस्थळ आहे.
जंगलात वसलेला आलिशान सुजान शेरबाग
रणथंबोरच्या मध्यभागी वसलेले सुजान शेरबाग हे एक अत्यंत आलिशान आणि प्रसिद्ध हॉटेल आहे. अलीकडेच येथे रेहान वाड्रा आणि अवीवा बेग यांच्या सगाईची चर्चा रंगली आहे. जंगलाच्या कुशीत उभारलेले हे हॉटेल राजेशाही अनुभव देणारे मानले जाते. येथे रॉयल शेर सुइट आणि टेंटेड जंगल सुइटसारखे खास पर्याय उपलब्ध असून एका रात्रीचे भाडे लाखोंच्या घरात आहे. किमान दोन रात्री आणि तीन दिवसांची बुकिंग आवश्यक असून, आलिशान सुविधांसह वन्यजीवनाचा नजारा पाहण्याची संधी येथे मिळते.
रणथंबोर किल्ला : इतिहास आणि निसर्गाचा संगम
रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाच्या आत एका डोंगरावर वसलेला रणथंबोर किल्ला हा या भागाचा ऐतिहासिक अभिमान आहे. दहाव्या शतकात बांधलेला हा किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. किल्ल्यावरून संपूर्ण जंगलाचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याच्या परिसरात असलेली प्राचीन मंदिरे आणि भग्नावशेष इतिहासाची साक्ष देतात.
त्रिनेत्र गणेश मंदिराची खास ओळख
रणथंबोर किल्ल्यातील त्रिनेत्र गणेश मंदिर हे अत्यंत श्रद्धास्थान आहे. भारतातील हे एकमेव मंदिर मानले जाते, जिथे तीन डोळ्यांची गणेशमूर्ती विराजमान आहे. विवाह, साखरपुडा किंवा अन्य शुभ कार्यांपूर्वी येथे गणेशजींना निमंत्रण पाठवण्याची परंपरा आजही पाळली जाते.





























































