
कल्याण, डोंबिवलीतील रस्ते काँक्रीटीकरणासाठी 350 कोटींहून अधिक निधी शासनाने दिला आहे. मात्र त्यातून सुरू असलेली कामे निकृष्ट आहेत. बऱ्याच ठिकाणी अर्धवट कामे आहेत. डिपीनुसार कामे न होता मनमानी पद्धतीने वर्कऑर्डर नसलेल्या ठिकाणीही पैशांची उधळपट्टी सुरू आहे. या सर्व कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे. शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन रस्ते काँक्रीटीकरण भ्रष्टाचारासह विविध समस्यांना वाचा फोडली.
कल्याण, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विभागात सध्या विविध विकासकामे सुरू असली तरी अनेक ठिकाणी अंमलबजावणीत अडथळे निर्माण होत आहेत. वाहतूक व्यवस्था, काँक्रीट रस्त्यांतील भ्रष्टाचार, स्मार्ट सिटी प्रकल्पातील ढिसाळ अंमलबजावणी तसेच रिंग रूट व डोंबिवली मोठागाव रेल्वे ओव्हर ब्रीज प्रकल्प आदी बाबतीत नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या पाश्र्वभूमीवर आज शिवसेना जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्यासह शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अभिनव गोयल अभिनव गोयल यांची भेट घेऊन या विषयांना वाचा फोडली. यावेळी जिल्हा संघटक तात्या माने, उपजिल्हाप्रमुख राहुल म्हात्रे, तालुकाप्रमुख मुकेश पाटील, शहरप्रमुख अभिजीत सावंत, प्रकाश तेलगोटे, सचिन जोशी, सदाशिव गायकर, आदित्य पाटील, ऋतुनील पावसकर आदी उपस्थित होते.
या मागण्यांकडे वेधले लक्ष
काँक्रीट रस्त्यांच्या कामासाठी ३५० कोटींचा निधी महापालिकेला मिळाला असतानाही नियोजनाअभावी निधीची उधळपट्टी केली जात आहे. २७ गावांमध्ये सुरू असलेल्या अमृत योजनेचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. पालिकेने स्वतंत्र वॉटर ट्रिटमेंट प्लांट उभारून स्वतःची जल व्यवस्था विकसित करावी, अशी मागणी दीपेश म्हात्रे यांनी यावेळी आयुक्तांकडे केली. यावर आयुक्त गोयल यांनी सर्व मागण्यांबाबत तातडीने उपाययोजना केली जाईल अशी ग्वाही दिली.