बदलत्या वातावरणाने पांढऱ्या कांद्याचा झाला वांदा

अवेळी पडत असलेला पाऊस, धुके या वातावरण बदलाचा फटका अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध आणि गुणकारी पांढऱ्या कांद्यावर परिणाम झाला आहे. कांद्याची मुळं ही ओल्या जमिनीमुळे कुजू लागल्याने शेतकऱ्यांनी बनविलेले वाफे मरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लहरी हवामानामुळे यंदा पांढऱ्या कांद्याचं उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे. गेली दोन वर्षे सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे पांढऱ्या कांद्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी गादी पद्धतीने त्याची लागवड करावी असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

अलिबागचा पांढरा कांदा हा सुप्रसिद्ध आहे. हा कांदा औषधी आणि गुणकारी आहे. त्यामुळे बाजारात अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला प्रचंड मागणी आहे. पांढऱ्या कांद्याला जीआय मानांकन ही मिळालेले असून यावर्षी उत्पादन वाढविण्याचा मानस कृषी विभागाचा होता. मात्र निसर्गापुढे हा मानस पूर्ण होणे कठीण झाले आहे. भात कापणी झाल्यानंतर जमीन सुकली की शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करतो. तालुक्यातील नेहुली, वाडगाव, सागाव, तळवली, कार्ले, खंडाळे या भागात पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. साधारण अडीच हजार हेक्टरवर पांढरा कांदा लागवड केली जाते. बदलत्या वातावरणाचा पांढरा कांदा लागवडीला फटका बसला असून रोगाचा धोका निर्माण झाला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून सतत निसर्ग बदलत असल्याने अवेळी पावसाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लावलेली कांदा लागवड नष्ट होत आहे. बदलत्या वातावरणात शेतकऱ्यांनी गादी पद्धतीची लागवड करणे सोयीचे ठरणार आहे. पाऊस पडला तरी वाफे फुकट जाणार नाही. त्यामुळे कांदा मोठा होऊन उत्पादन ही जास्त मिळण्याची शक्यता आहे. असे मत जिल्हा कृषी अधिकारी उज्वला बानखेले यांनी व्यक्त केले आहे. बाणेर आणि खेड येथे शेतकऱ्यांचे कांद्याचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले असून आठ दिवसात त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतर उपाययोजना काय करायचे हे ठरविले जाणार आहे. मात्र शेतकऱ्यांनी नवी पद्धतही अवलंबणे ही काळाची गरज असल्याचेही बानखेले यांनी म्हटले आहे.