
उन्हाळ्यात रोजच्या आहारात दहीचा समावेश केल्यास पचन सुधारते, शरीराला थंडावा मिळतो आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत दही खाणे हा एक सोपा आणि आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो. आपल्या घरांमध्ये रोजच्या जेवणात दह्याचा समावेश असतो.
दही हे कमी कॅलरीचे आणि अत्यंत पौष्टिक अन्न मानले जाते. विशेषतः उन्हाळ्यात दही खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. दही शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, पचनसंस्था निरोगी ठेवण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यात दही खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि उष्णतेमुळे होणाऱ्या अनेक त्रासांपासूनही संरक्षण मिळते.
दही खाण्याचे काही महत्त्वाचे फायदे
दही हे पचनासाठी अत्यंत चांगले अन्न मानले जाते. दह्यामध्ये जिवंत बॅक्टेरिया म्हणजेच प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. हे प्रोबायोटिक्स अन्न पचवण्यास मदत करतात आणि शरीराला पोषक घटकांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे करता येते. तसेच दही आतड्यांमध्ये हानिकारक बॅक्टेरियांची वाढ रोखण्यास मदत करते, त्यामुळे बद्धकोष्ठता, पोटफुगी आणि जुलाब यांसारख्या समस्या कमी होतात.
दही हे कमी फॅट आणि कमी कॅलरी असलेले अन्न आहे. त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असल्याने ते पोट जास्त वेळ भरल्यासारखे ठेवते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. दह्यातील कॅल्शियम हार्मोनच्या संतुलनावरही सकारात्मक परिणाम करून वजन व्यवस्थापनात मदत करते.
दह्यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो अॅसिड असते, जे ताण आणि चिंतेची पातळी कमी करण्यास मदत करते. नियमितपणे दही खाल्ल्याने मानसिक आरोग्य सुधारते आणि चिंता किंवा नैराश्याचा धोका कमी होऊ शकतो.
दही हे कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. कॅल्शियममुळे हाडे आणि दात मजबूत राहतात. त्यात फॉस्फरसही असतो, जो कॅल्शियमसोबत मिळून हाडांच्या विकासाला मदत करतो. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील काही खनिजद्रव्ये कमी होतात, ती भरून काढण्यासही दही मदत करते.



























































