
मुंबई महानगरपालिकेने क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी विव्रेत्यांना महात्मा जोतिबा फुले मंडईत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. तो स्थलांतराचा अन्याय का करता? क्रॉफर्ड मार्केटचे योग्य व्यवस्थापन करून, अद्ययावत सुविधा पुरवून मासळी विक्रेत्यांना न्याय द्या, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली.
क्रॉफर्ड मार्केट येथील मच्छीमारांचा विरोध पाहता त्यांचे स्थलांतर थांबवून त्यांना पूर्वीच्याच जागी काम करण्याची परवानगी देणार का? मच्छीमार कृती समिती ही पूर्वीच्या लिलावाच्या प्रक्रियेत नव्हती. ते सातत्याने विनंती करताहेत, लीझ आम्हाला द्या. तुमच्या अटी-शर्ती मान्य करून आम्ही चालवायला घेऊ. शासन हे मान्य करणार आहे का? नवीन विकास योजनेमध्ये मार्पेट निर्मितीसाठी शासन प्रयत्न करणार का? असे प्रश्न या लक्षवेधीच्या माध्यमातून सुनील शिंदे यांनी सभागृहात उपस्थित केले.
मासळी विक्रेत्यांचे स्थलांतर करताना नाव ट्रान्सफर करणे, परवाना काढणे अशा अडचणींना त्यांना सामोरे जावे लागणार आहे. जिथे त्यांचे स्थलांतर केले जात आहे तिथे मासळीच्या गाडय़ा थेट जाऊ शकत नसल्याने त्यांना कंटेनरची ने-आण करणे कठीण होणार आहे याकडेही आमदार शिंदे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.



























































