‘न्यू एरा क्लीनटेक’चा पत्ता कुठे? स्वदेशी कंपन्यांसाठी दावोसची वारी कशासाठी?, अंबादास दानवे यांचे मुख्यमंत्र्यांना चार सवाल

विदर्भातील तरुणांच्या रोजगाराच्या आशा आणि राज्य सरकारच्या गुंतवणूक घोषणांबाबत विरोधकांकडून पुन्हा एकदा तीव्र टीका होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘न्यू एरा क्लीनटेक’ प्रकल्प आणि दावोस येथील गुंतवणूक करारांबाबत चार प्रश्न विचारले आहेत. दानवे यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे की, दरवर्षी दावोसला जाऊन लाखो-कोटींच्या करारांची ‘कॅसेट’ वाजवली जाते, पण प्रत्यक्ष जमिनीवर काय स्थिती आहे? मुख्यमंत्र्यांनी या चार प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी केली आहे.

दानवे यांनी विचारलेले चार प्रमुख प्रश्न खालीलप्रमाणे:

१. ‘न्यू एरा क्लीनटेक’चा पत्ता कुठे? २०२३ मध्ये चंद्रपूरसाठी १५,००० रोजगारांची घोषणा झाली. २ वर्ष झाली, पण प्रकल्पाची एक वीटही रचली नाही! ही गुंतवणूक कागदावरच राहिली का? विदर्भातील तरुणांची ही दिशाभूल नाही का?

२. स्वदेशी कंपन्यांसाठी दावोसची वारी कशासाठी? लोढा, रहेजा, पंचशील, SBG – या कंपन्यांची कार्यालयं महाराष्ट्रातच आहेत. मग त्यांच्याशी करार करण्यासाठी कोट्यवधी खर्चून स्वित्झर्लंडला जाण्याची गरज काय? केवळ परकीय गुंतवणुकीचा (FDI) आकडा फुगवण्यासाठी हा इव्हेंट आहे का?

३. बँकांच्या तिजोरीला भगदाड पाडण्याचा डाव? ‘सुरजगड इस्पात’ सारख्या प्रकल्पांच्या MoUs मुळे कंपन्यांना बँकांकडून मोठं कर्ज मिळतं. पण प्रकल्प रखडले तर जनतेच्या पैशांचं काय? कंपन्यांच्या आर्थिक क्षमतेची तपासणी न करता बँकांना ‘भगदाड’ पाडण्यास सरकार वाव देत नाहीये ना?

४. आजवरच्या करारांचा ‘कन्व्हर्जन रेट’ किती? करार मोडणाऱ्या कंपन्यांनी काय कारणं दिली? किती तरुणांना प्रत्यक्षात नोकरी मिळाली?

अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे की, आता इव्हेंटबाजी थांबवून ‘गुंतवणूक आणि रोजगार’ या विषयावर श्वेतपत्रिका (व्हाइट पेपर) काढावी.