सिंधुदुर्गात ओमकार हत्तीचा धुमाकूळ, भातकापणी जवळ आल्याने शेतकरी हवालदिल

गोव्याच्या हद्दीतून परतल्यानंतर जंगली हत्ती ओमकार याने आपला मोर्चा शनिवारी दुपारी सिंधुदुर्ग जिह्यातील सातोसे-मडुरा परिसरात वळवला आहे. ओमकारच्या आगमनाची माहिती मिळताच शेतकरी हवालदिल झाले असून हा हत्ती शेतीचे नुकसान करणार असल्याची भीती त्यांना सतावत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ओमकार सातत्याने दोडामार्ग, बांदा, तिलारी, मोपा, तोरसे या भागांमध्ये फिरत आहे. त्याच्या सततच्या वावरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ हैराण झाले आहेत. सध्या तो सातोसे-मडुरा परिसरात शेतकरी व बागायत क्षेत्रात फिरत आहे. गावाच्या अंगणाजवळ आणि पाणवठ्याजवळही त्याची हालचाल दिसून येत आहे. दिवसाढवळ्या शेतात शिरून तो भातशेती, भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान करत असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

ऐन भात कापणीच्या वेळी हत्ती घुसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. ओमकारमुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचेच होत असल्याने ते हवालदिल झाले आहेत.

पकडून जंगलात सुरक्षित सोडा

वन विभागाने ओमकारला सुरक्षितरित्या पकडून त्याच्या मूळ अधिवासात पाठवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र हे प्रयत्न यशस्वी होत नसल्याचे दिसत आहे. हत्तीला जेरबंद करणे किंवा हुसकावून लावणे कठीण ठरत आहे. त्यामुळे मानवी जीवितहानी टळेल आणि शेतीचे नुकसान थांबेल यासाठी ओमकारला सुरक्षित पकडून दूरच्या जंगलात सोडण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.