हुंडा देणार नाही, हुंडा घेणार नाही! अमळनेरच्या मंगळग्रह संस्थानकडून भाविकांना शपथ

हुंडय़ासाठी वैष्णवी हगवणेचा बळी गेला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. हुंडय़ासाठी पुन्हा कोणा निष्पाप लेकीचा बळी जाऊ नये यासाठी अमळनेर येथील प्रसिद्ध मंगळग्रह संस्थानने पुढाकार घेतला असून वटपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांना संस्थानकडून ‘हुंडा देणार नाही, हुंडा घेणार नाही’ अशी शपथ देण्यात आली. संस्थानने घेतलेल्या या भूमिकेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात दररोज हुंडाबळीच्या घटना घडत आहेत. सासरच्या जाचाला पंटाळून विवाहिता आत्महत्या करत आहेत. एकूणच कुटुंबव्यवस्थेलाच अशा अनिष्ट रुढीपरंपरांनी धोक्यात आणले आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामुळे या प्रथापरंपरा पुन्हा चर्चेत आल्या. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी अमळनेरच्या मंगळग्रह संस्थानने पुढाकार घेतला. वटपौर्णिमेच्या निमित्ताने दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना संस्थानच्या वतीने ‘हुंडा देणार नाही, हुंडा घेणार नाही’, ‘कुटुंब व्यवस्था मोडणार नाही’, ‘लग्न समारंभात अतिरिक्त खर्चही करणार नाही’ अशी शपथ देण्यात आली. चुकीच्या प्रथा मोडून साध्या पद्धतीने विवाह करणार, काwटुंबिक हिंसाचार न करण्याचीही या वेळी शपथ देण्यात आली.

सामाजिक कुप्रथा मोडण्यासाठी शपथ देणारे मंगळग्रह संस्थान राज्यात पहिलेच असल्याचे विश्वस्त डॉ. दिगंबर महाले यांनी सांगितले. याप्रसंगी माजी आमदार साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, मुख्याधिकारी तुषार नेरकर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, करणसिंग राजपूत, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, अॅड. भैयासाहेब मगर आदींची उपस्थिती होती.