
पोलंडच्या इगा स्विटेक हिने जबरदस्त खेळ करत वर्षातील तिसऱ्या विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. तिने अंतिम लढतीत अमेरिकेच्या अमांडा एनिसिमोवाला केवळ 57 मिनिटांत 6-0, 6-0 असे सरळ सेट्समध्ये पराभूत करत ऐतिहासिक विजय नोंदवला. स्विटेक विम्बल्डन जिंकणारी पहिली पॉलिश महिला खेळाडू ठरली, हे विशेष.
ग्रॅण्डस्लॅम किताबाचा षटकार
माजी अव्वल मानांकित इगा स्विटेकने कारकिर्दीतील सहाव्या ग्रँडस्लॅम किताबावर आपले नाव कोरले. यापूर्वी तिने चार वेळा फ्रेंच ओपन (2020, 2022, 2023, 2024) आणि एकदा यूएस ओपनचा (2022) किताब जिंकलेला आहे. मात्र, तिचे हे पहिलेच विम्बल्डन जेतेपद होय.
अमांडाचा ऐतिहासिक पराभव
इगा स्विटेकच्या दबदब्यापुढे अमांडा एनिसिमोवा पूर्णपणे कोलमडली. 114 वर्षांच्या विम्बल्डन इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत एखाद्या खेळाडूला एकही गेम जिंकता आला नाही. अमांडाने संपूर्ण सामन्यात 28 बेजबाबदार चुका केल्या आणि खेळात ती सुरुवातीपासूनच अस्वस्थ दिसली.
एनिसिमोवासाठी निराशाजनक समाप्ती
23 वर्षीय अमांडा एनिसिमोवाचा हा पहिलाच ग्रैंडस्लॅम अंतिम सामना होता. 2019 मध्ये ती केवळ 17 वर्षांची असताना फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली होती. मात्र, त्यानंतर तिने मानसिक आरोग्याच्या कारणामुळे ब्रेक घेतला होता. विम्बल्डनमधील आजचा पराभव जिव्हारी लागल्याने सामना संपल्यानंतर अमांडाला अश्रू अनावर झाले.