थंडीतील पार्ट्यांना महागाईची फोडणी, माशांचा तुटवडा, चिकनही महागले! मांसाहारप्रेमींचे बजेट बिघडले

सुट्टीत थंडीचा आनंद घेत पाटर्य़ांचा बेत आखणाऱया मांसाहारप्रेमींचे बजेट बिघडले आहे. थंडीतील पाटर्य़ांना महागाईची झळ बसली आहे. समुद्रात वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे मार्केटमध्ये माशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. आवक कमी झाल्याने बहुतांश माशांच्या दरात प्रतिकिलो 200 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचवेळी चिकनचा दर 280 रुपये किलोवर गेला आहे. त्यामुळे रविवारी मुंबईकरांना जिभेचे चोचले पुरवणे चांगलेच महागडे ठरले.

‘थर्टी फर्स्ट’च्या आठवडय़ापासून मुंबईत पाटर्य़ांना ऊत येतो. घरोघरी तसेच मित्रमंडळी एकत्र येऊन चिकन पार्टींचे बेत आखतात. रविवारी अनेक कुटुंबात मांसाहार ठरलेलाच असतो. मात्र सध्या माशांचा तुटवडा निर्माण झाल्याने यावेळच्या रविवारी मुंबईकरांचा ‘मूड ऑफ’ झाला. माशांची आवक कमी झाल्याने पश्चिम उपनगरांतील अनेक मार्केटमध्ये मासेच मिळेनासे झाले. काही ठिकाणी विक्रीला ठेवलेले मासेदेखील दोन-तीन दिवसांपूर्वीचे होते. फ्रिजमध्ये ठेवण्यात आलेले मासे विकताना अनेक विक्रेते दिसले. मत्स्यप्रेमी फ्रिजमधील मासे खरेदी करण्यास नकार देत होते. ‘फिश मार्केट’मधील माशांचा तुटवडा चिकन विक्रेत्यांच्या पथ्यावर पडला. एक किलो चिकन 280 रुपयांना विकले जात होते. एरवी केवळ माशांना पसंती देणाऱ्या मुंबईकरांनी महागड्या दराने चिकन खरेदी केली. रविवारी सकाळी पूर्व व पश्चिम उपनगरातील चिकन विक्रेत्यांकडे गर्दी झाली होती. चिकनबरोबरच अंडय़ांचीही मागणी वाढल्याने अंडय़ांच्या दरात वाढ झाली.

वेगवान वाऱ्याचा मासेमारीवर परिणाम

मासेमारीसाठी मच्छीमार खोल समुद्रात 14 ते 18 तासांपर्यंतच्या दूर अंतरावर जातात. तेथे वाऱयाचा वेग जास्त असतो. या स्थितीत समुद्रात जाळी टाकता येत नसल्याने मासे कमी मिळतात. त्याचा परिणाम ‘फिश मार्केट’मध्ये जाणवत आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये माशांचे प्रमाण जास्त होते. त्या तुलनेत आता तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे माशांचे दर प्रतिकिलो 200 रुपयांनी वाढले आहेत, असे ससून डॉक मच्छीमार बंदर बचाव कृती समितीचे पदाधिकारी कृष्णा पवळे यांनी सांगितले.

माशांचे दर (प्रतिकिलो)
सुरमई 850 रुपये
हलवा 750 रुपये
बांगडा 220 रुपये
बारापुडा 220 रुपये
काटबांगडा 80 रुपये
रेबिन फिश 190 रुपये