ऐन थंडीत जव्हारवासीयांवर पाणीटंचाईचे संकट, खडखड नळ पाणी योजना कागदावरच

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व्ह चार दिवसांपूर्वी तुटला असून रोज फक्त पंधरा ते वीस मिनिटे नळाला पाणी येते. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण झाली असून ऐन थंडीत जव्हारवासीयांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. लवकरात लवकर व्हॉल्व्हची दुरुस्ती करून पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. व्हॉल्व्ह तुटून चार दिवस उलटले तरी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे.

जव्हार शहराची पाणीपुरवठा व्यवस्था सुमारे 100 वर्षे जुन्या पाइपलाइनवर अवलंबून आहे. त्याची नियमित देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने वारंवार गळती, दाब कमी होणे आणि व्हॉल्व्ह निकामी होण्याचे प्रकार घडत आहेत. परिणामी संपूर्ण पाणी वितरण व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. मात्र याचा नाहक त्रास हा शहरातील नागरिकांना होत आहे.

2017 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जव्हार शहराची गरज लक्षात घेऊन खडखड पाणी योजनेसाठी 17कोटी रुपये मंजूर केले होते मात्र नऊ वर्षे पूर्ण होऊनदेखील ही योजना पूर्ण झाली नाही. अजूनही शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये पाइपलाइन खोदणे व बसवण्याचे काम प्रलंबित आहे.

– पाणीपुरवठा यंत्रणा देखभालीसाठी नेमण्यात आलेले तांत्रिक कर्मचारी पुरेसे प्रशिक्षित नसल्याचा आरोप नागरिकांकडून नियोजनामुळे लहान बिघाडही वेळेत दुरुस्त होत नाहीत.

– प्रत्यक्षात दर्जेदार काम न करता केवळ कागदोपत्री बेसुमार कामे दाखवून बिल काढले जात असल्याचा आरोपही सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहेत.

– शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाला असल्याचे पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी लागणारी साधनसामग्री उपलब्ध झाली असून संबंधित विभागाला हे काम तातडीने करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे सभापती इम्रान मेमन यांनी सांगितले.