हिवाळी अधिवेशन – शासकीय कार्यालयांत यूडीआयडी कार्ड सक्ती

राज्यातील सर्व शासकीय कार्यालये व विभागांमध्ये युनिक डिसॅबिलिटी आयडी (यूडीआयडी) कार्ड सादर करणे सक्तीचे करण्यात आले आहे. आरक्षण, पदोन्नती, विविध शासकीय सवलती यासाठी यूडीआयडी कार्ड अनिवार्य असल्याची माहिती इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. विधानसभा सदस्य बापू पठारे, सुनील प्रभू, विजय वडेट्टीवार, विक्रम पाचपुते, हेमंत उगले यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

संत मुक्ताई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ाला गती

जळगाव  जिह्यातील कोथळी येथील संत मुक्ताई मंदिर तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शिखर समितीकडे पाठविण्यात आला असून मान्यता मिळताच उर्वरित कामे पूर्ण करण्यात येतील, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

आमदार खोपडेंना मिळालेल्या धमकीची चौकशी होणार

आमदार कृष्णा खोपडे यांना मोबाईलवर देण्यात आलेल्या धमकीशी कोण संबंधित आहे आणि ते कुणासाठी काम करतात, याची चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे आणि त्यांच्या बाकी कारभाराच्या संदर्भात सगळी माहिती घेऊन वस्तुस्थितीदर्शक निवेदन सभागृहात केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी त्यांना मोबाईलवर मिळालेल्या धमकीची माहिती आज विधानसभेत शून्य प्रहरात दिली. तुम्ही तुकाराम मुंढेच्या विरोधात  बोलू नका, नाहीतर याचे गंभीर परिणाम होईल, अशी धमकी दिल्याचे खोपडे यांनी सांगितले.