टीईटी प्रमाणपत्र नसतानाही सत्तारांच्या मुलीला शिक्षक म्हणून कायम नियुक्ती

गायरान जमीन घोटाळा,  कृषी महोत्सवासाठी सुरू असलेल्या पठाणी वसुलीचे वादळ घोंगावत असतानाच मंगळवारी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गैरव्यवहाराचे आणखी एक धक्कादायक प्रकरण महाराष्ट्रासमोर आले. टीईटी प्रमाणपत्र नसतानाही अब्दुल सत्तार यांच्या मुलीला शिक्षक म्हणून कायम नियुक्ती देण्यात आल्याचा खळबळजनक गौप्यस्पह्ट माहितीच्या अधिकारात झाला आहे.

बारामती येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची मुलगी हीना कावसर हिच्या शिक्षक म्हणून करण्यात आलेल्या नियुक्तीसंदर्भातील दस्तऐवज माहितीच्या अधिकारात मागवले होते. यादव यांना संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने हीना कावसर यांच्या शिक्षणसेवक म्हणून करण्यात आलेल्या नेमणुकीपासून ते कायम नियुक्तीपर्यंतची सर्व कागदपत्रे उपलब्ध करून दिली आहेत. विशेष म्हणजे नितीन यादव यांनी सत्तार यांची दुसरी मुलगी उजमा नाहीद अब्दुल सत्तार शेख हिच्या दुसऱया मुलीच्या नियुक्तीसंदर्भातील कागदपत्रांचीही मागणी केली होती. परंतु जिल्हा परिषदेने तिच्या नियुक्तीची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले आहेत.

जन्मतारखाही वेगवेगळय़ा

हीना कावसर यांच्या आधार, पॅन व शाळा सोडल्याच्या दाखल्यावर वेगवेगळय़ा जन्मतारखा असल्याने शिक्षण विभागाने कोणती तारीख गृहित धरून त्यांना शिक्षक म्हणून कायम नियुक्ती दिली, असा सवाल करण्यात येत आहे.

नियम पायदळी तुडवून कायम नियुक्ती

शिक्षक भरतीवर राज्य सरकारने 2 मे 2012 रोजी बंदी घातली आहे. मात्र खासगी संस्थांना संच मान्यता घेऊन नियुक्त्या देता येतात. कायम नियुक्ती द्यायची असेल तर त्यासाठी टीईटी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. मात्र अब्दुल सत्तार यांची मुलगी शेख हीना कावसर अब्दुल सत्तार यांना 16 ऑगस्ट 2018 रोजी सिल्लोड येथील नॅशनल उर्दू एज्युकेशन सोसायटी या संस्थेत शिक्षक म्हणून कायम करण्यात आले. मात्र कायम नियुक्तीसाठी कोणताही प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला नव्हता.