कळवा रुग्णालयाच्या दारातच महिलेची प्रसूती; प्रसव कळा येत असतानाही दाखल करून घेतले नाही

कळवा रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे एका गर्भवतीची रुग्णालयाच्या दारातच प्रसूती झाली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेला प्रसव कळा येत असतानाही रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला तर एक बाळ दगावले असून एक बाळ बचावले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या वर्षी एकाच रात्री 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असताना आज सकाळी 9 च्या सुमारास रुगालयाच्या एका गर्भवतीची कळवा रुग्णालयाच्या बाहेरच प्रसूती झाली. गर्भवती महिलेच्या पोटात दुखू लागल्याने ती महिला रुग्णालयात पहाटे 4 च्या दरम्यान आली. परंतु तिला घरी पाठवण्यात आले. घरी गेल्यावर पुन्हा पोटात दुखू लागल्याने सकाळी 9 च्या सुमारास पुन्हा रुग्णालयात आली. मात्र रुग्णालयाच्या आवारात पोहोचताच गर्भवती महिलेची प्रसूती झाली. एका बालकाला रुग्णालयाबाहेरच जन्म दिल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला जाग आली. दरम्यान, दुसऱ्या बालकाची प्रसूती मात्र रुग्णालयात करण्यात आली. यात पहिल्या बाळाचा मृत्यू झाला तर दुसरे बालक व्यवस्थित आहे.

… तर घटना टाळता आली असती
ज्यावेळी ही महिला पहाटे पोटात दुखत असल्याने रुग्णालयात आल्यानंतर या महिलेला तेव्हाच दाखल करून का घेण्यात आले नाही? असा प्रश्न आता नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे. कळवा रुग्णालय ते आतकोनेश्वरनगर यामधील अंतर जास्त असल्याने तसेच हा भाग डोंगरपट्ट्यातील असल्याने रुग्णालयात वेळेत पोहोचणे शक्य नाही. या महिलेला दाखल केले असते तर हा अनर्थ टळला असता अशी भावना नातेवाईकांकडून व्यक्त केली जाते.

महिलेने प्रसूतीसाठी नावनोंदणी केली होती. ती महिला आठ महिन्यांची गर्भवती असल्याने प्रसूतीची वेळ आली नव्हती. जेव्हा सकाळी 9 च्या दरम्यान ही महिला आली तेव्हा तिची रुग्णालयाबाहेरच प्रसूती झाली. रुग्णालयाच्या वतीने तातडीने या महिलेला शस्त्रक्रिया विभागात नेऊन तिच्यावर उपचार सुरू केले. यामध्ये एका बालकाचे वजन 1.4 किलो असल्याने ते फार अशक्त होते त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या बालकाचे वजन 2 किलोच्या वर असल्याने हे बालक व्यवस्थित आहे.
– डॉ. अनिरुद्ध माळगावकर (वैद्यकीय अधीक्षक)