
रिक्षातील प्रवासी महिलेची पर्स हिसकावणाऱ्याला न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. श्रेयश पडवळ (20) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना 2020 मध्ये कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.
कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2020 मध्ये रिक्षामध्ये प्रवास करणाऱ्या स्पुर्ती लक्ष्मीनारायण या महिलेजवळील पर्स आरोपी श्रेयश याने जबरदस्तीने खेचून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. हा खटला ठाणे मुख्य न्याय दंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांच्या न्यायालयात आल्यावर सरकरी वकील प्रमिला चव्हाण जाधव यांनी साक्षी, पुरावे आणि इतर कागदपत्रे न्यायालयात सादर केली. तसेच युक्तिवाद करून न्यायालयात सरकारी बाजू प्रभावीपणे मांडली. मुख्य न्याय दंडाधिकारी कुलकर्णी यांनी पडवळ याला दोषी ठरवत चार वर्षांची सक्तमजुरी तसेच दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टी. एन. डुंबरे यांनी केला. तसेच कोर्ट ड्युटी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार विजय सानप, पोलीस शिपाई नितेश कुंभार तर समन्स ड्युटी पोलीस हवालदार उत्तम जंगले व मोहनदास धिंदळे यांनी कामकाज पाहिले.




























































