
कौटुंबिक वादातून विवाहितेला चाकूचा धाक दाखवून तिचे हातपाय नायलॉन दोरीने बांधून बाथरुममध्ये कोंडल्याची घटना देवगडमध्ये घडली. पीडित विवाहितेने घटनेची माहिती पोलिसांच्या 112 नंबरवर दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत विवाहितेची सुटका केली. याप्रकरणी पाच जणांविरोधात देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुजारेवाडी येथे मंगळवारी पहाटे ही घटना घडली.
स्मिता गणेश घाडी (60), अमिता अनिल बाणे (62), दिव्या गणेश घाडी (32), अनिल गणपत बाणे (63), सुनीता सूर्यकांत बाणे (64) या संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता ही मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरानजीक असलेल्या शौचालयात गेली होती. यावेळी संशयित स्मिता घाडी, अमिता बाणे, दिव्या घाडी, अनिल बाणे, सुनीता बाणे यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर तिचे हातपाय नायलॉन दोरीने घट्ट बांधून बाथरुमकडे ओढत नेले. त्यानंतर तिला बाथरुममध्ये कोंडून बाहेरून लॉक लावून बंदिस्त केले.
या घटनेदरम्यान पीडित विवाहितेकडे मोबाईल होता. तिने पोलिसांच्या 112 क्रमांकावर फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर देवगड पोलीस स्थानकाचे कॉन्स्टेबल नीलेश पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जात पीडित विवाहितेची सुटका केली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असल्याचे पीडित विवाहितेने देवगड पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा तपास महिला पोलीस हवालदार अमृता बोराडे करीत आहेत.