कामे होत नसल्याने महिला पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घुसल्या

18


सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर

कामे होत नसल्याने अचानकनगर भागातील महिला पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घुसल्या. त्यामुळे संतापलेल्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी आपला विषेशाधिकार वापरून त्या भागातील काँग्रेस नगरसेवक मुख्तार शहा यांना तात्पुरते निलंबित केले. यावेळी झालेल्या गोंधळात विषय पत्रिकेवरील सर्व विषय न वाचताच मंजूर करण्यात येऊन सभा तहकूब करण्यात आली.

पालिकेच्या यशवंतराव चव्हान सभागृहात आज सकाळी नगराध्यक्षा आदिक यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी बाबूराव बिक्कड यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभेस प्रारंभ झाला. विषय पत्रिकेवरील विषयांना प्रारंभ करण्यापूर्वीच गोंधळास सुरूवात झाली. पत्रिकेबाहेरील विषयांनी विरोधकांनी सुरूवात करीत सत्ताधारी गटास कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक अंजूम शेख यांनी पत्रिकेवरील विषयांवर चर्चा करण्याचे आवाहन सभागृहास केले.

याच दरम्यान अचानकनगर भागातील काही महिला आपल्या मागण्या घेऊन सभागृहात येण्याचा प्रयत्न करू लागल्या मात्र कर्मचाऱ्यांनी त्यांना दरवाजामध्येच अडविले. यावेळी नगरसेवक शहा यांनी मध्यस्थी करीत त्यांना आत येऊ देण्यास सांगितले. या महिला आपल्या मागण्या सांगण्यापूर्वीच या प्रकाराने भडकलेल्या नगराध्यक्षांनी रूद्रावतार धारण केला. ही मागण्या घेऊन येण्याची पद्धत नसून हा सभागृहाचा अवमान आहे. त्यासाठी शहा यांनी सभागृ्हाबाहेर जावे. त्यांचे निलंबन करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यास विरोधी काँग्रेस नगरसेवकांनी मोठा विरोध केला. या गोंधळात सत्ताधारी नगरसेवकांनी सर्व विषय मंजूर म्हणत सभा तहकूब केली.

दरम्यान, शहरात कुठल्याही प्रकारचा विकास करता आला नाही. भुयारी गटारीचे सुमारे सव्वा सहा कोटी रूपयांचे कर्ज परत जाण्याची नामुष्की ओढावली आहे. कर्नाटकी या व्यापाऱ्याने केलेल्या आत्महत्येस पालिका प्रशासन जबाबदार आहे. यासर्व प्रश्नांची उत्तरे नसल्याने निलंबनाचे नाटक करून सभा तहकूब केल्याचा आरोप विरोधी नगरसेवक संजय फंड, मुज्जफर शेख, श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, मनोज लबडे, शहा, भारती कांबळे, आशा रासकर आदींनी केला. तर झालेली विकास कामे पहावत नसल्याने विकास कामांवर चर्चा करण्याऐवजी महिलांना सभेत घुसवून गोंधळ घातला गेला. हा सर्व प्रकार पूर्वनियोजित होता. त्यामुळे निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती नगराध्यक्षा आदिक यांनी दिली.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
कर्नाटकी या व्यापाऱ्याच्या आत्मह्त्येस सत्ताधारी नगरसेवक व नगराध्यक्षा जबाबदार आहेत. तेथील गाळ्यांमध्ये काही नगरसेवकांची सेटींग असून पालिका प्रशासनाने केलेल्याय दुर्लक्षामुळेच त्यांचा बळी गेला. मुख्याधिकाऱ्यांसह दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी श्रीनिवास बिहाणी यांनी पत्रकार परिषदेत केली.

आपली प्रतिक्रिया द्या