International Women’s Day : पर्सनॅलिटी उत्तम आहे तू स्टंट कर ना.. हेअर ड्रेसरच्या एका वाक्याने तिचं आयुष्यच बदललं; स्टंट वूमनची जबरदस्त कहाणी

>> प्रभा कुडके

स्टंटसमध्ये काम करणारे 100 पुरूष असतील तर, त्यांच्यामागे केवळ 10 महिला काम करताना दिसतील. त्यातलीच एक नेहा उर्फ गीता टंडन. नेहाचं या क्षेत्रात येणं अगदी अचानक झालं. शिक्षण निव्वळ दहावीपर्यंत झालेल्या नेहाला पुढे काय करावं हे कळत नव्हतं. घरची परिस्थिती हलाखीची होती. मग करायचं तरी काय, म्हणून वडिलांनी लग्न लावून दिलं. नेहाची आई लहान असतानाच वारली होती. पंजाबी कुटूंबात वाढलेल्या नेहाच्या घरचे उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे तिचे वडिल करायचे ते देवीचं जागरण आणि तोच एकमेव कमवण्याचा मार्ग होता. पंजाबी लोकांमध्ये देवीचं जागरण करण्यासाठी तिचे वडिल अनेक कलाकारांच्या घरी जात असतं.

वडिलांबरोबर जागरणाला लहानपणापासून जाणाऱ्या नेहाने नृत्याची कला अवगत करून घेतली. त्यानंतर तिने प्रवेश केला दलेर मेहंदीच्या ग्रुपमध्ये. दलेर मेहंदीच्या ग्रुपमध्ये जाऊन ती नाचू लागली. मग स्टेज शो, लग्न अशा अनेक ठिकाणी तिने तिचं काम सुरु केलं. पण त्यानंतर काही काळातच लग्न झाल्यामुळे तिच्या या सर्व गोष्टींना पूर्णविराम मिळाला. लग्नानंतर घर खूप चांगलं मिळालं पण नवरा मात्र तिला मानसिकदृष्टया अतिशय त्रास देत असे. अखेर त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा पंजाबी किंग दलेर मेहंदी यांच्या स्टेज शोमध्ये नाचणं सुरू झालं. पण त्यात मात्र मिळणारा पैसा फारसा समाधान देणारा नव्हता.

नवऱ्याला सोडल्यावर कामाची खूप गरज होती. सासरी असताना नेहा बाइक शिकलेली होती. मुलं घेऊन वेगळी झाल्यावर मात्र काय करायचा हा प्रश्न पडल्यावर पंजाबी भांगडा हा पर्याय निवडला. पण त्यातले पैसे मुलांना पोसण्यासाठी खूपच कमी पडू लागले. एकदा डान्स शुटींगच्या दरम्यान एक हेअर ड्रेसर भेटली. ती म्हणाली, अगं तुझी पर्सनॅलिटी उत्तम आहे तू स्टंट कर ना.. स्टंट म्हणजे काय हे माहितही नसणारी नेहा या सर्व गोष्टींच्या शोधात निघाली. त्या हेअर ड्रेसरने प्रिया नावाच्या एका मुलीचा तिला नंबर दिला. सातत्याने दोन महिन्यांच्या प्रयत्तनानंतर शकीरा नावाच्या बिनधास्त चॅनेलवरच्या सिरीयलमध्ये काम मिळालं. कामाचा श्रीगणेशा झाला आणि पैसेही चांगले मिळू लागले. त्यानंतर मग तिने मागे वळून पाहिलं नाही. स्टंट करताना लोकांनी ओळखावं असं कधीच वाटत नाही असं नेहा अगदी स्पष्ट शब्दात सांगते. गीताने सुलतान चित्रपटातील अनुष्का शर्मा, राजी मधील आलिया भट यांच्यासह इतर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसाठी बॉडी डबल म्हणून काम केले आहे.

माझ्यासाठी तरी केवळ पैसाच महत्त्वाचा आहे. पहिल्याच शॉटला काही मिनिटांचे मला 501 रुपये मिळाले. त्यानंतर मग स्टंटमध्येच काम करायचं हे नक्की केलं. स्टंटसाठी बेसिक जे काही हवं ते सर्व शिकून घेतलं. सध्या तरी याच कामावर माझं घर अवलंबून आहे. मुलांची शाळा आणि माझा प्रवासखर्च या सर्वात इतका खर्च होतो की विचारता सोय नाही. तरी जोपर्यंत होईल तोपर्यंत स्टटंसमध्येच काम करण्याचा इरादा पक्का असल्याचं तिने सांगितलं.