Women’s Hockey Asia Cup – हिंदुस्थानचा कोरियावर दमदार विजय

गट फेरीत अजेय राहिलेल्या हिंदुस्थानने दक्षिण कोरियावर 4-2 गोलफरकाने मात करीत महिला हॉकी आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-4 फेरीत दमदार विजय मिळविला. हिंदुस्थानकडून वैष्णवी विठ्ठल, संगीता कुमारी, लालरेम्सियामी आणि ऋतुजा पिसाळ यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. कोरियासाठी दोन्ही गोल किम युजिन हिने केले. हिंदुस्थानचा आगामी सामना उद्या, 11 सप्टेंबरला सायंकाळी 4.30 वाजता यजमान चीनशी होणार आहे.

सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला हिंदुस्थानला पेनल्टी कॉर्नर मिळाला. उदिताने डाव्या बाजूला लो शॉट मारला तो कोरियन गोलरक्षकाने रोखला. मात्र चेंडू गोलपोस्टसमोर उभ्या असलेल्या वैष्णवीकडे आला. तिने तत्काळ चेंडू जाळय़ात धाडत हिंदुस्थानचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत हिंदुस्थानकडे 1-0 अशी आघाडी होती.

सामन्याच्या 32व्या मिनिटाला संगीता कुमारीने दुसरा गोल केला. सलिमाने मिडफिल्डवरून पास टाकला तो ऋतुजाच्या पायाशी आला. ऋतुजाने अचूक पास देत संगीताकडेच चेंडू पोहोचवला आणि संगीतानेही सहज फटक्यात गोल केला, मात्र त्यानंतर केवळ एक मिनिटानंतरच (33 व्या मिनिटाला) कोरियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. किम युजिनने मारलेला लो शॉट हिंदुस्थानी डिफेंडरला चकवून थेट गोलमध्ये गेला अन् कोरियाने 1 -2 असे अंतर कमी करत सामन्यात रंगत निर्माण केली. मग 39 व्या मिनिटाला हिंदुस्थानने पुन्हा दोन गोलची आघाडी घेतली.

लाँग कॉर्नरवरून उदिताने दिलेल्या पासवर लालरेम्सियामीने प्रतिस्पर्धी डिफेंडरला चकवून मागे वळून शॉट मारला. चेंडू गोलरक्षकाच्या हातातून सुटून सरळ गोलमध्ये गेला. 53 व्या मिनिटाला किम युजिनने दुसऱ्यांदा पेनल्टी कॉर्नरवर गोल करत पुन्हा गोलअंतर 2-3 असे कमी करून सामना रंगतदार बनवला.

ऋतुजाच्या गोलने हिंदुस्थान निश्चिंत

सामन्याच्या अंतिम टप्प्यात उभय संघांतील खेळाडूंमध्ये जबरदस्त चुरस बघायला मिळाली. दक्षिण कोरियन खेळाडू बरोबरीसाठी जिवाचे रान करताना दिसत होते. मात्र शेवटच्या क्षणी (59व्या मिनिटाला) ऋतुजा पिसाळने चौथा व निर्णायक गोल केला. पेनल्टी
कॉर्नरवर उदिताचा शॉट गोलरक्षकाने रोखला, पण परतलेला चेंडू ऋतुजाकडे आला. तिने डाईव्ह मारत शानदार गोल करून हिंदुस्थानचा विजय निश्चित केला.