WPL 2023 मुंबई इंडियन्स फायनलमध्ये, दिल्लीशी होणार जेतेपदासाठी मुकाबला

नॅट शिवर-ब्रंटच्या 38 चेंडूंतील तडाखेबंद नाबाद 72 धावा आणि इस्सी वाँगने 15 धावांत टिपलेल्या 4 विकेटच्या जोरावर मुंबई इंडियन्सने यूपी वॉरिअर्सचा 72 धावांनी दणदणीत पराभव केला आणि पहिल्या महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता पहिल्या जेतेपदासाठी येत्या रविवारी दिल्ली पॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्स भिडेल.

मुंबई इंडियन्सने उभारलेल्या 4 बाद 182 धावांचा पाठलाग करणे यूपी वॉरिअर्सला जमलेच नाही. दुसऱया षटकापासूनच युपी वॉरिअर्सला धक्के बसू लागले. ते थेट 18 व्या षटकांतच थांबले. किरण नवगिरेने 27 चेंडूंत केलेली 43 धावांची खेळी सर्वाधिक ठरली. पहिल्या 20 चेंडूंतच यूपीचे तीन फलंदाज बाद झाल्यानंतरच त्यांनी हार मानली होती. त्यानंतर किरणचा अपवाद वगळता त्यांचा एकही खेळाडू संघर्ष करू शकला नाही आणि मुंबई इंडियन्सने एकतर्फी विजयाची नोंद केली. त्याअगोदर शिवर-ब्रंटने 9 चौकार आणि 2 षटकार खेचत केलेल्या नाबाद 72 धावांमुळे मुंबईने 182 असा धावांचा डोंगर उभारला. मुंबईच्या डावात यास्तिका भाटिया (21), हेली मॅथ्यूज (26), अमेलिया केर (29) यांनीही मोलाची कामगिरी केली.