जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा,मनीष, अमितचे पदक पक्के

340

अमित पांघल व मनीष कौशिक या हिंदुस्थानी खेळाडूंनी बुधवारी आपापल्या लढती जिंकून जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील दोन पदके पक्की केली. अमितने 52 किलो गटात, तर मनीषने 63 किलो गटात स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली.

2017 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचा प्रवास केलेल्या अमित पांघलने फिलिपीन्सच्या कार्लो पालमचा 4-1 गुणांनी पाडाव करून आगेकूच केली. द्वितीय मानांकित अमितने आक्रमण आणि संरक्षण या दोन्ही आघाडय़ांवर सरस खेळ करून कार्लोला निष्प्रभ केले. आता उपांत्य लढतीत त्याची गाठ कझाकिस्तानच्या साकेन बिबोसिनोव याच्याशी पडेल. साकेनने उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या आर्टर होवहाइनस्यान याचा पराभव करून आगेकूच केली. त्यानंतर मनीष कौशिकनेही 63 किलो गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत ब्राझीलच्या वॉण्डरसन डी ओलिविएरा याचा 5-0 गुणांनी धुव्वा उडवून हिंदुस्थानचे आणखी एक पदक पक्के केले. या स्पर्धेत विजेंदर सिंह, विकास कृष्णन, शिव थापा व गौरव बिधुडी यांनी हिंदुस्थानला पदके मिळवून दिलेली आहे. आता या क्लबमध्ये अमित पांघल आणि मनीष कौशिक यांचाही समावेश झाला आहे. 91 किलो गटात हिंदुस्थानच्या संजीतचे आव्हान संपुष्टात आले. त्याला उपांत्यपूर्व लढतीत इक्वाडोरच्या जुलियो सीसा कास्टिलो टोरेसकडून हार पत्करावी लागली. कविंदर बिस्टचे आव्हान संपुष्टात आले.

आपली प्रतिक्रिया द्या