
वरळी आणि नायगाव येथील बीडीडी चाळींच्या जागेवर उंच व आलिशान टॉवर्स उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून सप्टेंबरपर्यंत सुमारे 2300 रहिवाशांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या मिळणार आहेत. वरळी बीडीडीतील 556 सदनिकांचे वाटप येत्या दोन आठवडय़ांत तर 1419 सदनिकांचे हस्तांतरण येत्या सप्टेंबर महिन्यात करण्यात येणार आहे. नायगाव बीडीडीतील 342 रहिवाशांना नव्या सदनिका येत्या डिसेंबर महिन्यात सुपूर्द केल्या जाणार आहेत.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास नियंत्रण नियमावली 33 (7) अंतर्गत प्रस्तावित सुधारणा यासह म्हाडाच्या विविध अधिनियम अंतर्गत प्रस्तावित सुधारणांचा तसेच म्हाडामार्फत राबविण्यात येणाऱ्या बीडीडी चाळ व इतर प्रकल्पांचा आढावा घेतला. म्हाडाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या बीडीडी चाळ प्रकल्पांवरही या वेळी चर्चा झाली.
वरळी बीडीडी चाळीतील 9869 पुनर्वसन सदनिकांपैकी 3888 सदनिकांचे काम प्रगतीपथावर असून पुढील दोन आठवडय़ांत 556 सदनिकांचे हस्तांतरण होणार आहे. तसेच 1419 सदनिकांचे सप्टेंबर 2025मध्ये हस्तांतरण करण्यात येणार आहे. तर 1642 सदनिकांचे हस्तांतरण ऑगस्ट 2027पर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नायगाव बीडीडी चाळीतील 3344 सदनिकांपैकी 1938 सदनिकांचे काम प्रगतीपथावर असून सप्टेंबर 2025मध्ये 864 सदनिकांचे हस्तांतरण करण्याचे नियोजन असल्याचे या वेळी सांगण्यात आले. ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळीच्या प्रकल्पातील 2560 पुनर्वसन सदनिकांपैकी 1241 सदनिकांचे काम प्रगतीपथावर आहे. यापैकी 342 सदनिकांचे हस्तांतरण डिसेंबर 2025पर्यंत करण्यात येणार आहे.
अशी झाली सकारात्मक चर्चा
बांधकाम परवानगीसाठी आकारण्यात येणाऱ्या विकास शुल्कावरील दंडनीय व्याजाचा दर कमी करणे, म्हाडास उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त क्षेत्रफळाच्या सदनिका या संक्रमण शिबिरासाठी वापरणे अथवा सोडतीद्वारे विक्री करणे, विनिमय 33(4) अंतर्गत रहिवाशांना अतिरिक्त क्षेत्राचा लाभ देणे व या क्षेत्रावर प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्राचा लाभ देणे यासह विनिमय 33(5), 33(7), 33(9) व 33 (24) अंतर्गत सुचविण्यात आलेल्या सुधारणा, म्हाडा वसाहतीतील विकास आराखड्यातील आरक्षण आदी विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली.