वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास वेगाने होत असून चाळींच्या जागेवर टोलेजंग टॉवर उभे राहत आहेत. या टॉवरमध्ये चाळकऱ्यांना भविष्यात देण्यात येणाऱ्या 1618 पुनर्वसन सदनिकांची सोमवारी संगणकीय प्रणालीद्वारे निश्चिती करण्यात आली. त्यामुळे चाळकऱ्यांना आपल्या पुनर्वसन सदनिकेचा आणि इमारतीचा क्रमांक, मजला या गोष्टी निश्चित झाल्या आहेत.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा नागरी पुनरुत्थान प्रकल्प आहे. म्हाडाच्या माध्यमातून वरळीच्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम सध्या जोरात सुरू आहे. मे. टीसीसी कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत वरळीतील 121 चाळींचा पुनर्विकास करून 9689 सदनिका उभारण्यात येणार आहे. याअंतर्गत सोमवारी वरळी बीडीडीमधील चाळ क्र. 57, 58, 59, 60, 61, 78, 79, 80, 81, 82 मधील 332, चाळ क्र. 22 ते 28 मधील 443 आणि चाळ क्र. 64 ते 74 आणि 77 मधील 693 आणि चाळ क्र. 75 आणि 76 मधील 150 अशा एकूण 1618 चाळकऱ्यांची म्हाडातर्फे सदनिका निश्चिती करण्यात आली. सदनिकांची निश्चिती झाल्यानंतर म्हाडातर्फे रहिवाशांसोबत करारनामा केला जाईल. रहिवाशांना एकरकमी भाडय़ाचा किंवा संक्रमण शिबिराचा पर्याय देऊन चाळी रिक्त केल्या जातील. त्यानंतर रिक्त चाळींच्या जागी पुनर्वसन इमारतींच्या कामाला सुरुवात होईल अशी माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्याने दिली.