99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावर्षीचे जानेवारीत संमेलन सातारा येथे होणार आहे. साताऱ्यामधे होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यासाठी पुण्यातील साहित्य परिषदेत आज सकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पानिपतकार विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध व लोकप्रिय कादंबरीकार आहेत. त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय विषयांवर आधारित अनेक प्रभावी कादंबऱ्या लिहिल्या आहेत. ‘पानिपत’ ही त्यांची सर्वाधिक गाजलेली ऐतिहासिक कादंबरी असून त्याची भूरळ आजही मराठी वाचकांवर आहे. पानिपत सारख्या ऐतिहासिक कादंबरीसाठी त्यांनी प्रचंड अभ्यास केला. विविध ऐतिहासिक ग्रंथ, दस्तऐवज, पत्रव्यवहार, तसेच तत्कालीन स्थलदर्शन यावर आधारित तपशील त्यांनी कथानकात गुंफले आहेत. यामुळे त्यांची लेखनशैली तथ्यपूर्ण, विश्वासार्ह आणि ऐतिहासिकदृष्ट्या बिनचूक वाटते.